जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२४ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी पुन्हा वाढताना दिसत आहे. यातच हत्येच्या घटनेने जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. विशेष सख्ख्या मोठ्या भावाने गोठ्यात झोपलेल्या सख्ख्या लहान भावाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून सपासप वार करीत खून केला. ही भयानक घटना भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथे (ता. १२) घडली. विठ्ठल पाटील (वय ४८) असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून याबाबत मृताची पत्नी रेखा विठ्ठल पाटील यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अभिमन आनंदा पाटील (वय ६१, रा. पिचर्डे) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
भडगाव पोलिस ठाण्यात रेखा पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की माझा जेठ अभिमन पाटील हा शेतजमिनीचा हिस्सा पालट करून द्या, असे पती विठ्ठल आनंदा पाटील यांना वारंवार सांगत होता.
तेव्हा त्याला पती विठ्ठल पाटील हे वडिलोपार्जीत जमिनी या ज्याच्या-त्याच्या नावावर करून द्या, असे सांगत असत. याचा राग मनात ठेवून व आमच्या खळ्यातील शेळ्यांना जागा करण्यासाठी तारजाळी बांधण्यास जेठ अभिमन पाटील विरोध करीत होता.
याच कारणावरून पती विठ्ठल पाटील (वय ४८) हे रात्री खाटेवर झोपलेले असताना अभिमन पाटील याने डोक्यावर लोखंडी कुऱ्हाडीने वार करून पतीचा खून केला. त्यावरून संशयित आरोपी अभिमन पाटीलविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा उपनिरीक्षक शेखर डोमाळे तपास करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच चाळीसगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी अभयसिंह देशमुख, पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक निरीक्षक चंद्रसेन पालकर, उपनिरीक्षक डोमाळे, सहाय्यक फौजदार अनिल अहिरे, हवालदार मुकुंद पाटील, पोलिस शिपाई महेंद्र चव्हाण यांनी भेट दिली. आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. भडगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाले. त्यानंतर पिचर्डे गावी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.