जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेकडो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२२ । सोमवारी राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यात देखील सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा काढणीवर आलेले दादर, हरभरा, गहू व इतर पिके जमीनदोस्त झाली आहेत. दरम्यान, आज जळगावला यलो अलर्ट जारी करण्यात आला असून आणखी काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकरीवर्ग धास्तावला आहे.
हवामान खात्याने सोमवारपासून पुढील तीन दिवस राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाची शक्यता वर्तविला होता. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह विजांचा कडकडाट, गारपीट आणि वादळी वाऱ्यासह सोमवारी सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेकडो हेक्टरवरील दादर, हरभरा, गहू व इतर पिके जमीनदोस्त झाली आहेत. यामुळे खरीप हंगांमा सोबतच आता रब्बीचे उत्पन्न देखील निसर्गाने शेतक-यांच्या तोंडातील घास हिसकावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर खुप मोठे संकट ओढवले आहे.
शेतकरी पुन्हा संकटात
यावर्षी आधीच खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर दुबार तर काही भागात तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यांनतर रब्बीचा हंगाम तरी पदरी पडेल; या आशेने बसलेल्या शेतकरी वर्गाला निसर्गाने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा देत ऐन तोंडात आलेला घास हिसकावून घेतला आहे. दादर, गहू, जमीनदोस्त झाला असून कापून ठेवलेले हरभऱ्याला रात्रीत कोम आल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. तसेच वादळी वाऱ्याने कापून ठेवलेला हरभरा देखील उडून गेल्याने शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले आहे.
पंचनामे करावे
तहसील विभागाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई जाहिर करून शेतकऱ्याला या संकटातून बाहेर निघण्यास सहकार्य करावे; अशी आग्रही मागणी जोर धरू लागली आहे. अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकविमा व नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत असतांनाच आता अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याची वेळ प्रशासनावर आली आहे.