जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२३ । बांगलादेश किनार्यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा धोधो पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.त्यानुसार आज बुधवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव जिल्हयात आज म्हणजेच 2 आणि 3 ऑगस्ट रोजी यलो अलर्ट जारी केला आहे.
जिल्ह्यात या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. आज सकाळपासून जिल्ह्यामधील अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरु आहे. जिल्ह्याला 3 ऑगस्टपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला असला तरी जिल्ह्यात मात्र अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडे पडले असून, पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट
दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्राती काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यालाही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, पालघरसह मुंबईला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.