जळगाव जिल्ह्यात या तारखेला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता..
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२३ । राज्यात मागील काही दिवस मुसळधार पाऊस बरसला. मात्र आता राज्यातील पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून आज राज्याच्या थोड्याच भागात पावसाची शक्यता आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसापासून अधून मधून पाऊस कोसळत असून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
कुलाबा (मुंबई) येथील वेधशाळेने दिलेल्या शक्यतांनुसार जळगाव जिल्ह्यात १ आणि २ ऑगस्ट रोजी काही ठिकाणी ढगांचा गडगडाट, वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. तर आज ३१ जुलै आणि ३ ऑगस्ट रोजी हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसाच्या दिवशी प्रशासनाने नदीकाठच्या गावांवर लक्ष असू द्यावे, अशी सूचना देण्यात आली आहे.
दरम्यान, जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी रविवारी दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शहरात तसेच सखल भागात पुन्हा एकदा पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. बजरंग बोगदा, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरात काही वेळ पाणी साचले.