जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२४ । हवामान खात्याने यंदा मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात शेतकरी वर्गाकडून खरीप हंगामासाठी तयारी सुरू केली आहे. यातच जिल्हा कृषी विभागाकडूनदेखील खते व बियाण्यांचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.
जिल्ह्यात कापूस लागवडीसाठी नऊ लाख ५० हजार बियाण्यांची पाकिटे बाजारात उपलब्ध झाली आहेत. यासह ५० हजार मेट्रिक टन खतांचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी यांनी दिली. जिल्ह्यात यंदा ७ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पेरणी करण्यात येणार आहे. त्यात ५ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाच्या पेरणीचा अंदाज आहे.
२ लाख २१ हजार मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध
खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून २ लाख २१ हजार ७९५ मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात गेल्या हंगामातील १ लाख ८१ हजार ४२६ मेट्रिक टन खतांचा साठा शिल्लक आहे. आतापर्यंत ५० हजार मेट्रिक टन खतांचा साठा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खते भरून न ठेवता, जशी गरज लागेल, तशी खतांची खरेदी करण्यात यावी, असे आवाहन कषी विभागाकडन करण्यात आले आहे.
२७ लाख बियाण्यांच्या पाकिटांचे वाटप
जिल्ह्यात ५ लाख ५० हजार हेक्टर कापसाच्या लागवडीचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी २७ लाख ९१ हजार बियाण्यांच्या पाकिटांची गरज आहे. याबाबत कृषी विभागाकडून कृषी आयुक्तांकडे मागणी करण्यात आली होती. त्यापैकी प्रमुख पुरवठादार कंपन्यांना २२ लाख ४७ हजार, तर इतर कंपन्यांना कापूस बियाण्यांच्या ५ लाख ४५ हजार पाकिटांच्या पुरवठ्याचे आवंटन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना १५ मेपासूनच बियाणे उपलब्ध करून देण्यात आले असले तरी शेतकऱ्यांनी १ जूननंतरच कापसाची पेरणी कराची, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.