जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात हिट अँड रनचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. आईसोबत पायी चालणाऱ्या बालिकेला भरधाव कारने धडक दिली. यात बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना अमळनेर तालुक्यातील पाडसे रस्त्यावर घडली. रेखमा विजय नाईक (वय ८) असं मृत बालिकेचे नाव असून याप्रकरणी पळून जाणाऱ्या चालकाला गावकऱ्यांनी पकडत चोप देवून मारवड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकी घटना?
संगीता विजय नाईक ह्या त्याची आठ वर्षाची मुलगी रेखमा सोबत पाडसे रस्त्याच्या कडेने विहिरीवर पाणी भरण्यास जात होते. त्यावेळी पाडसे कडून चौबारीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने (क्रमांक एमएच ०२ बीजे ५४२०) भरधाव वेगाने जात रेखमा हिला धडक दिली. सदर वाहनचालक अमळनेरच्या दिशेने पळून गेला. मुलीचे वडील विजय नाईक व ग्रामस्थांनी मुलीकडे धाव घेत तिला खाजगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
सदर घटनेप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ शरीफ पठाण हे करीत आहेत. दुर्घटना झाल्याचे व चालक पळून गेल्याचे कळताच काही ग्रामस्थांनी अमळनेरकडे धाव घेतली. व सदर वाहनचालकाला पकडत चोप दिला. यावेळी मारवड पोलिसांनी सदर चालकास व वाहनाला ताब्यात घेतले आहे. विकास प्रकाश वानखेडे (वय २५, रा. भालेगाव ता. मलकापूर जि. बुलढाणा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला शुक्रवारी अमळनेर सत्र न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर केला आहे.