जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२५ । येत्या काही महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांकडून आतापासून तयारी केली जात आहे. मात्र त्यापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाला जळगाव जिल्ह्यात मोठा धक्का बसला. शरद पवार गटाचे पाच माजी आमदार लवकरच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.

मुंबईत शनिवारी ३ मे रोजी त्यांचा पक्षप्रवेश होईल. त्यामुळे राजकीय समिकरणे बदलणार असून संघटनात्मक ताकद वाढवायला अजित पवारांना हा बुस्टर डोस ठरू शकतो. आधीच अजित पवारांसोबत गेलेल्या काही पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश घेता आला नव्हता. मात्र, आता देवकर यांच्यासाठी मार्ग मोकळा झाला होता. त्यांच्या पाठोपाठ माजी राज्यमंत्री डॉ. सतीश पाटील, माजी आमदार दिलीप वाघ (पाचोरा), माजी आमदार कैलास पाटील (चोपडा) आणि माजी विधान परिषद सदस्य दिलीप सोनवणे यांनीही सोबत जाण्याची तयारी दर्शवली. जिल्हा बँकेच्या माजी संचालिका तिलोत्तमा पाटील आणि पक्षाचे प्रवक्ते वाल्मीक पाटील यांनीही अजित पवारांच्या पक्षात प्रवेश घेण्याची तयारी केल्यामुळे या सर्व नेत्यांचा शनिवारी मुंबईत पक्ष कार्यालयात अधिकृतपणे प्रवेश होणार आहे. मंगळवारी जिल्हा बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. बँकेचे अध्यक्ष संजय पवार हेही यावेळी उपस्थित होते.
असे होतील परिणाम
या दिग्गजांच्या प्रवेशामुळे अजित पवार यांची जळगाव जिल्ह्यातील संघटनात्मक ताकद वाढणार आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांच्या पक्षाला या ताकदीचा लाभ होईल. माजी मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील हे आतापर्यंत अजित पवारांच्या पक्षात एकमेव बडे नेते होते. आता त्यांचे महत्त्व काही प्रमाणात कमी होईल