जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पावसाने उघडीप दिल्याने आता जळगावकरांना गुलाबी थंडीची चाहूल लागली असून आज सकाळी वातावरणात धुकं पाहायला मिळालं. जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवसांत हिवाळ्याची औपचारिक सुरुवात होणार आहे.

जळगाव जिल्ह्यात दिवाळीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे खरीप पिकाचं मोठं नुकसान झालं. यादरम्यान ढगाळ वातावरणामुळे तापमानात चढ उतार दिसून आले. आता मागच्या तीन दिवसापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने उघडीप दिली. यामुळे हवामानात पुन्हा बदल होऊन थंडीची चाहूल लागू लागली.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र कमकुवत होत असून, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे थंड हवा दक्षिणेकडे सरकत आहे. या कारणास्तव शहर व जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवसांत हिवाळ्याची औपचारिक सुरुवात होणार आहे. दरम्यान, जळगाव शहरासह जिल्ह्यात धुक्याची चादर पांघरली होती.

जळगाव जिल्ह्यात ६ ते ८ नोव्हेंबरपासून थंडी तर ८ तारखेनंतर गारठा जाणवेल. किमान तापमान १३ ते १७ तर कमाल तापमान २९ ते ३१ अंश राहील. ६ नोव्हेंबरच्या संध्याकाळपासून हवेत काहीसा कोरडेपणा आणि गारवा जाणवेल परिणामी आर्द्रता देखील घटेल व त्यामुळे थंडीचा जोर हळूहळू वाढेल. थंडीचे आगमन होणार असल्याचे हवामान अभ्यासक यांनी सांगितले.
राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?
दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्याने आज कमी अधिक प्रमाणात पावसाला पोषक वातावरण निर्माण होणार आहे. पुढील काही दिवसात पाऊस राज्याची रजा घेणार आहे. राज्यात आज कोकण, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह कमाल व किमान तापमानात चढ – उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.





