जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२५ । तेलंगणा राज्यातील सितापूरम येथून लग्न सोहळ्यासाठी निघालेले जळगाव जिल्ह्यातील एक दाम्पत्य रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. याबाबत या दांपत्याच्या नातेवाईकांनी नांदुरा पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील डोकलखेडा येथील रहिवाशी असलेले पदमसिंग दामू पाटील हे तेलंगणा राज्यातील धोंडापाडू व्हीलेज (ता. चिपलम, जि. सूर्यपेठ) येथे झुआरी सिमेंट लि. या कंपनीत संचालक म्हणून नोकरीला आहेत. त्यांच्या मावस भावाच्या मुलीचे तसेच आतेभावाचे येत्या ३० नोव्हेंबर व ५ डिसेंबर रोजी लग्न आहे. त्यासाठी आठ दिवसांची सुटी काढून पत्नी नम्रतासह गुरुवारी (दि. २७) सकाळी सहा वाजता एम.एच. १३, बी.एन. ८४८४ या कारने जळगावकडे निघाले होते.

ते गुरुवारी रात्री १० वाजता गावी पोहचण्याचा अंदाज होता. परंतू २४ तास उलटूनही ते घरी पोहोचलेच नाही. दोघांचेही मोबाइल बंद येत असल्यामुळे त्यांच्या काळजीने कुटुंबीयांनी शोध घेण्याचा आतोनात प्रयत्न केला. मात्र ते कुठे सापडलेच नाही. त्यांच शेवटच मोबाईल लोकेशन हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मलकापूर दरम्यान महामार्गावर असलेल्या वडनेर गावाजवळ आढळून आलं.

त्यानंतर हे दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याची तक्रार दांपत्याच्या नातेवाईकांनी नांदुरा पोलिसात दाखल केली आहे. यानुसार आता पोलिसांच पथक या दांपत्याच्या शोधासाठी निघालेल आहे. अचानक बेपत्ता झालेल्या दांपत्याच्या घटनेमागे घातपाताचा संशय ही व्यक्त होत आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून या घटनेची पायामुळं खणून काढत आहेत.





