जळगाव लाईव्ह न्यूज। १२ डिसेंबर २०२४ । गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही शेतकऱ्याच्या कापसाला अपेक्षित दर मिळत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. कापूस उत्पादनासाठी लागलेला खर्च पाहता मिळत असलेल्या दरात खर्च देखील निघणे शक्य नसून समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून असल्याचे चित्र आहे.
जळगावसह धुळ्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात येते. यंदा देखील कापूस लागवड झाली असून पावसाळ्यात अविरत झालेल्या पावसामुळे कापूस उत्पादनावर परिणाम झाला आहे. यातच कापसाला सुरवातीपासूनच साडेसहा ते सात हजार इतका दर मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. बळीराजाला भाववाढीची प्रतीक्षा लागून आहे.
अजूनपर्यंत समाधानकारक दर मिळत नसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती अद्यापही निराशाच लागली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी जवळपास दीड ते दोन महिन्यांपासून शेतातून कापूस काढून घरातच साठवून ठेवला आहे. कापसाला योग्य भाव मिळेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी कापूस विक्री केलेली नाही. कापसाच्या दरात वाढ झाली नसल्यामुळे शेतकऱ्याच्या हाती निराशा लागली आहे.
कापसाच्या दरात वाढ होणार कधी? याकडेच आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आणखी काही दिवस घरात साठवून ठेवलेला कापूस असाच पडून राहिला; तर त्यामुळे त्वचेच्या रोगांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागण्याची देखील भीती आहे. त्यामुळे कापुस दर वाढीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.