जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२५ । उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे जळगावसह महाराष्ट्रातील बहुतांश भागात थंडीने आणखी जोर पकडला आहे. शनिवारी जळगाव येथे ६ अंश सेल्सिअस इतके कमी तापमानाची नोंद करण्यात आलीय. यामुळे जळगावकर थंडीने गारठले असून हा या हंगामातील आतापर्यंतचा नीचांकी पारा नोंदवण्यात आला.

गेली अनेक दिवस थंडीची हुडहुडी भरलेल्या महाराष्ट्राला उत्तरेकडील गारव्याने गारठून सोडले आहे. उत्तर- मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात शनिवारी पुन्हा कमी तापमानाची नोंद झाली. अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल आणि किमान तापमानात घट नोंदवली गेली. त्यामुळे रात्री अधिक थंडी आणि दिवसा गार वारे या दुहेरी तडाख्याने नागरिकांना हुडहुडीचा सामना करावा लागत आहे. यात सर्वाधिक तडाखा धुळे, नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगरात जाणवत आहे.

या आठवड्यात सोमवारी (१५ डिसेंबर) जळगावचे किमान तापमान ११ अंशाच्या वर गेला होता. तापमानाचा पारा वाढला असला तरी रात्री आणि सकाळच्या वेळेस हुडहुडी थंडीचा कडाका कायम होता. यात मागच्या तीन चार दिवसात तापमानात घसरण झाली. दोन दिवसापूर्वी ८ अंशाच्यावर असलेला पारा शनिवारी ६ वर घसरला असून जळगावकर थंडीने गारठले आहे. मंगळवारपर्यंत पारा घसरलेलाच राहील. रविवारी किमान तापमान आणखी खाली येईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.






