जळगावमध्ये थंडीची तीव्रता आणखी वाढली ; पारा ६.९ अंश सेल्सिअसवर

डिसेंबर 13, 2025 9:25 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२५ । उत्तर भारतातून येणाऱ्या शितलहरींमुळे जळगाव शहरासह जिल्ह्याच्या किमान तापमानात घसरण झाली असून यामुळे थंडीने जळगावकर गारठले आहे. जळगावचा पारा पुन्हा घसरला असून ममुराबाद वेधशाळेकडून ११ डिसेंबर रोजी रात्री जळगावचे किमान तापमान ६.९ अंश सेल्सियस इतके खाली पोहोचल्याची नोंद करण्यात आली आहे.

cold weather

यापूर्वी, डिसेंबर २०२१ मध्ये तापमान ६.७ अंशापर्यंत खाली आले होते. त्यामुळे, गेल्या चार वर्षानंतर पुन्हा एकदा डिसेंबरमध्ये थंडीची तीव्रता वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आज देखील थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज असून मात्र अति थंडीमुळे केळी पिकाला फटका बसत असून तर दुसरीकडे या थंडीचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे

Advertisements

गेल्या आठवड्यात किमान तापमानात वाढ झाली होती. ७ डिसेंबर २०२५ पर्यंत किमान तापमानाचा पारा १२ अंशावर स्थिर होता. मात्र या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून तापमानात घसरण सुरु आहे. सलग पाचव्या दिवशी किमान तापमान घसरले आहे. ज्यामुळे जळगाव मध्ये कडाक्याची थंडी वाढली आहे. ११ डिसेंबर रोजी रात्री जळगाव शहराचे किमान तापमान ६.९ अंश सेल्सियस इतके होते.

Advertisements

जळगाव जिल्ह्यात तापमानात घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे सद्य स्थितीत जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील वातावरण पूर्णपणे कोरडे असून, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा मार्गदेखील मोकळा आहे. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण ४० टक्के इतकेच आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात थंडीची लाट पसरली आहे. उत्तरेतील जम्मू-काश्मीर व हिमाचल प्रदेशमध्येदेखील बर्फवृष्टी वाढली आहे. बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात हवेचा दाब स्थिर आहे. त्यामुळे आगामी काळात नवीन चक्रीवादळ व कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे सद्य स्थितीत तापमानात घट कायम राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

थंडीचा रब्बीला फायदा, पण केळी पिकाला फटका
नव्याने लागवड झालेल्या केळीच्या कांदेबागाला फटका बसण्याची शक्यता आहे. अति थंडीमुळे केळीची वाढ थांबण्याची शक्यता असून, पानेदेखील पिवळी पडण्याची शक्यता आहे. तसेच मृग केळीची निसण्याची वेळ असते, त्यामुळे निसण्याचा प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. रब्बीच्या हरभरा, गहू, मका, ज्वारी या पिकांना थंडीमुळे फायदा होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now