जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२४ । जळगावसह राज्यात गेल्या आठवड्यात अवकाळीच्या ढगांमुळे काहीशी थंडी कमी झाली होती. मात्र आता अवकाळीचा ढग निवळले आहे. यातच उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात पुन्हा किमान तापमान घटणार असून यामुळे हाड गोठणाऱ्या थंडीचा जोर वाढणार आहे.
नवीन वर्षाच्या आगमनासह जळगाव थंडीचे जोरदार पुनरागमन होणार आहे. यादरम्यान, रात्रीचा पारा ७ ते ८ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. आज मंगळवारी काही अंशी किमान तापमानात घट होऊ शकते.
खरंतर वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल होऊन, कडाक्याच्या थंडीवरुन हवामानात बदल होऊन जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यासह ढगाळ वातावरणामुळे रात्रीच्या तापमानात वाढ होऊन, जिल्ह्यातील थंडी गायब झाली होती. गेल्या आठवड्यात रात्रीचा पारा १९ अंशावर पोहोचला होता. मात्र गेल्या दोन तीन दिवसापासून किमान तापमानाचा पारा घसरताना दिसत आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, नव्या वर्षाची सुरुवात गुलाबी थंडीने होणार आहे. येत्या काही दिवसात रात्रीच्या तापमानात सध्या असलेल्या तापमानाच्या तुलनेत ७ ते ८ अंशाची घट येण्याचा अंदाज देण्यात आला आहे.
जळगावातील सध्याचे तापमान?
जळगाव जिल्ह्यात सोमवारी दिवसभर ढगाळ व काही अंशी ऊन असे संमिश्र वातावरण राहिले. किमान पारा १६ अंशावर होता. त्यामुळे रात्रीही काही प्रमाणात गारवा जाणवला. तसेच सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत १० ते १२ किमी वेगाने वारे जळगाव शहर व परिसरात वाहत होते. आज मंगळवारी काही अंशी किमान तापमानात घट होऊ शकते. १ जानेवारीनंतर वातावरणात आणखीन बदल होतील.