जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२१ । जिल्ह्यातील शेंदुर्णी व जळगाव येथील खाटीक व्यावसायिक बकऱ्या घेऊन कल्याणकडे जात असताना सटाणा चौफुलीजवळ लुटीच्या उद्देशाने आलेल्या तीन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. गोळीबारमध्ये गंभीर जखमी झालेल्या जळगाव शहरातील व्यावसायिकाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर संशयित फरार झाले असून त्यांचा शोध घेत आहेत.
जळगाव व शेंदुर्णी येथील चौघे खाटीक व्यावसायिक बकरी ईदनिमित्त बकऱ्या विक्रीसाठी पिकअप वाहनाने कल्याणकडे जात होते. दि.८ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास त्यांचे वाहन मालेगाव शहराजवळ येताच सटाणा रोडवर दुचाकीवरून तिघांनी त्यांचा पाठलाग केला.
दुचाकीस्वारांनी पिस्तूलचा धाक दाखवून वाहन थांबवण्यास सांगितले. मात्र, त्यांनी वाहन न थांबवल्याने सटाणा चौफुलीजवळ संशयितांपैकी एकाने वाहनावर गोळीबार केला. गोळी क्लीनरच्या बाजूस बसलेल्या जावेद खाटीक यांच्या डोक्याला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. गोळीबार करून संशयित फरार झाले. घटनेनंतर चालकाने मनमाड चौफुली भागात थांबून घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना कळवली. जखमी जावेदला धुळे येथे ओम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले होते.
दि.९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जावेद यांचे निधन झाले. शनिवारी रात्री त्यांचे पार्थिव जळगावातील कुंभारवाडा परिसरातील घरी आणण्यात येणार असून त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
हल्लेखोरांचा शोध सुरू
हल्ल्याचे कारण स्पष्ट नसले तरी लुटीच्या उद्देशाने गोळीबार झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. परिसरातील हॉटेल्स व इतर दुकानांच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.