जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२५ । मागच्या १५ दिवसापासून गायब झालेला पाऊस आता पुन्हा सक्रिय झाला असून हवामान खात्यानं राज्याला पुढचे ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील कोकण-गोवा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. तर जळगाव जिल्ह्यातला आगामी तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. आज आणि उद्या कोकण-गोव्यातील रायगड आणि रत्नागिरी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट विभागात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अन्य जिल्ह्यांसह मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत विदर्भ आणि कोकणातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर कोकण-गोव्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जळगावात आगामी तीन दिवस येलो अलर्ट
गेल्या पंधरवड्यापासून ब्रेक घेतलेल्या पावसाने जळगाव जिल्ह्यात पुनरागमन केले आहे. मागील दोन दिवस जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. यामुळे मरणासन्न अवस्थेपर्यंत पोहोचलेल्या खरीप पिकांना नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. पावसामुळे कमाल तापमानातही घसरण झाली यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे सक्रिय झाल्यामुळे मान्सूनची सक्रियता वाढली. त्याचा सकारात्मक परिणाम जळगावात पावसावर होईल. हवामान खात्यानं जळगाव जिल्ह्याला रविवारपर्यंत (दि.१७) पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.





