जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२५ । जळगाव विमानतळाचा विस्तार आणि सुविधा वाढीबाबत खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. रनवे विस्तार, टर्मिनल सुविधा सुधारणा, विमानसेवा वाढवणे आणि एकूणच विमानतळाच्या क्षमता वाढवण्याच्या मागण्यांकडे नागरी विमानन मंत्रालयाने गांभीर्याने लक्ष दिले आहे.

नागरी विमान मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या उत्तरानुसार, जळगाव विमानतळाच्या टर्मिनलचा विस्तार 500 चौ. मीटरपर्यंत करण्याचे काम सुरू आहे. यामुळे प्रस्थान आणि आगमन लाउंजमध्ये प्रत्येकी 75 प्रवासी सामावू शकतील. याशिवाय, सॅक बार, ट्रॉली आणि वाहनतळ व्यवस्थापनासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. विमानतळाचा विस्तार झाल्यास व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांना अधिक चांगल्या सेवा मिळतील. याचा थेट फायदा जळगाव आणि परिसरातील आर्थिक आणि औद्योगिक वाढीस होईल.
विमानतळाचा मास्टर प्लॅन अंतिम टप्प्यात असून, भविष्यात टर्मिनल आणि एप्रन उत्तरेकडे हलवण्याचा प्रस्ताव आहे. तसेच, विमानतळाच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी विस्तृत नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, भविष्यात प्रवासी संख्या आणि विमानसेवेच्या वाढीच्या आवश्यकतेनुसार आणखी विस्तार करण्याची तयारी मंत्रालयाने दर्शवली आहे.
खासदार स्मिता वाघ यांनी जळगावसाठी अधिक विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, सध्या कोणत्याही एअरलाइनकडून अतिरिक्त उड्डाणांसाठी प्रस्ताव आलेला नसला, तरी भविष्यात मागणी आल्यास त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना खासदार स्मिता वाघ म्हणाल्या, “जळगाव विमानतळाच्या सुधारणा आणि विस्तारासाठी केंद्र सरकार सकारात्मक आहे. हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत. अधिक विमानसेवा मिळवण्यासाठी व्यापारी, उद्योजक आणि नागरीकांसोबत संवाद साधून पुढील रणनीती ठरवली जाईल. जळगावच्या विकासासाठी हे विमानतळ अत्यंत महत्त्वाचे असून, भविष्यात अधिक सुविधा आणि सेवा मिळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
जळगाव विमानतळाच्या विकासामुळे येथील व्यवसायिक, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. उत्तम हवाई सुविधा मिळाल्यास जळगाव आणि परिसरात नवीन गुंतवणूकदार येण्यास प्रोत्साहन मिळेल आणि पर्यटन क्षेत्रालाही नवी दिशा मिळेल. जळगावसारख्या वाढत्या शहराला सक्षम विमानसेवा असणे गरजेचे आहे आणि याकरिता स्थानिक पातळीवरूनही अधिक पाठपुरावा करण्यात येणार आहे.