जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२५ । जळगाव एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत ६१ नग गॅस सिलेंडर चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींकडून चोरी केलेल्या आयशर वाहनासह ६१ नग गॅस सिलेंडर जप्त केले आहे.

शेख फिरोज शेख याकुब (रा. नशिराबाद) आणि सैय्यद मुश्ताक सैय्यद अशपाक (रा. उस्मानिया पार्क, जळगाव) असं अटक केलेल्या आरोपींचे नाव असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण?
एमआयडीसी पोलीस ठाण्यात १४ नोव्हेंबर रोजी भारत पेट्रोलियम जळगाव येथून रिफिलिंग केलेले ३४२ नग सिलेंडर एका ट्रक वाहनामध्ये भरून एमआयडीसी परिसरात पार्किंग केले होते. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी सदर वाहन जागेवर दिसले नाही. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या या वाहनातून ६१ नग सिलेंडरची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करत असताना, एमआयडीसी पोलिसांनी गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळवत आरोपींची ओळख पटवली. पोलिसांनी जळगाव शहरातील एमआयडीसी भागात सापळा रचून शेख फिरोज शेख याकुबला ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर त्याने आपला साथीदार सैय्यद मुश्ताक सैय्यद अशपाक याच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी या दोन्ही आरोपींकडून चोरी केलेले १ लाख २२ हजार रुपये किमतीचे ६१ नग गॅस सिलेंडर हस्तगत केले. तसेच, गुन्ह्यात वापरण्यात आलेले सुमारे ५ लाख रुपये किमतीचे आयशर वाहन देखील जप्त केले आहे.







