जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२५ । जळगाव तालुक्यातील जळगाव खुर्द गावाजवळील उड्डाणपुलालगतच्या सर्व्हिस रस्त्यावर झोपलेल्या तीन परप्रांतीय मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना ११ मार्च रोजी उघडकीस आली होती. या घटनेचा नशिराबाद पोलिसांनी उलगडा केला आहे. सुदामा प्रसाद पटेल (वय २४, रा. उफरवली, मध्यप्रदेश) याने मुरूम घेऊन रिव्हर्स घेताना डंपरखाली तिघांना चिरडले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये डंपर दिसून आल्यानंतर त्याचा भांडा फुटला अन पोलिसांनी चौकशीत ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देखील दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्याला न्यायालयाने १५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून या गुन्ह्यात कलम वाढविण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली.

या घटनेबाबत असे की, जळगाव खुर्द गावाजवळील उड्डाणपुलालगत सर्व्हिस रस्त्याचे काम सुरू आहे. त्या रस्त्यावर शैलेंद्रसिंग नथ्थुसिंग राजपूत, भूपेंदर मिथीलाल राजपूत (दोन्ही रा. दलेलपूर, ता. विटा. जि. उत्तर प्रदेश) व योगेश कुमार राज बहादूर (रा. सिढपूर, उत्तर प्रदेश) काम आटोपून सोमवारी रात्री झोपले होते. मंगळवारी पहाटे सुदामा हा मुरूमने भरलेला डंपर घेऊन तेथे आला. नंतर मुरूम टाकण्यासाठी तो सर्व्हिस रस्त्यावर भरधाव वेगाने डंपर रिव्हर्स घेऊन गेला. त्याचवेळी डंपर तिन्ही मजुरांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना लक्षात येताच, सुदामा लागलीच डंपर घेवून तेथून निघून मजुरांच्या कॅम्पमध्ये जावून बसला.
असा लागला तपास, सीसीटीव्ही फुटेजची झाली मदत
तिन्ही मजुरांच्या मृत्यू बातमी सर्वत्र पसरताच संपूर्ण पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. घटना कशी घडली, कुठले वाहन होते याचा तपास पोलिसांनी सुरू केला. घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण महामार्गासह आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरू केले होते. एका सिमेंट कंपनीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास पोलिसांना एक डंपर घटनास्थळाजवळ दिसून आल्यावर पोलिसांना घटनेचा उलगडा करता आला.
मजुरांसह रस्त्याच्या कामासाठी नियुक्त चालकांची पोलिसांनी चौकशी सुरू केली. सुदामा यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. आधी तो काहीही बोलला नाही; मात्र फुटेजच्या आधारावर त्याला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने घटनेची माहिती देवून त्याच्या डंपरच्या खाली तिघांचा मृत्यू झाल्याची कबुली दिली. त्याला न्यायालयाने १५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.