जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२४ । राज्यावर असलेलं अवकाळी पावसाचं सावट आता काही प्रमाणात घटलं असून बहुतांश ठिकाणी उष्णतेत मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, जळगावात देखील तापमानाचा तडाखा वाढला असून आग ओकणाऱ्या उष्णतेमुळे नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे. यातच उद्या म्हणजेच २९ एप्रिलपासून तापमानात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत
सध्या जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाली आहे. यातच वाढलेला उकाडा आणि उष्णतेच्या झळांमुळे जळगावकर प्रचंड हैराण आहेत. गेल्या तीन दिवसांपासून चाळिशीपार आणि शनिवारी ४३.९ अंश असलेल्या तापमानात आज रविवारी काही प्रमाणात घट येणार आहे. रविवारी जिल्ह्यात ठिकठिकणी ढगाळ वातावरण राहील; पण आद्रता वाढणार असल्यामुळे उकाडा देखील वाढणार आहे. त्यामुळे चटका लगाण्याऐवजी घामाच्या धारा निघतील. २९ एप्रिलपासून तापमानात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत
त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. ३० एप्रिल ते ५ मे या कालावधीत जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. सध्या किमान तापमानात देखील वाढ झाल्याने रात्रीचाही उकाडा जाणवत आहे.