⁠ 
सोमवार, मे 6, 2024

जळगावच्या तापमानात पुन्हा वाढ ; ‘या’ तारखेनंतर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचे संकेत

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२४ । सध्या महाराष्ट्रात दुहेरी हवामान अनुभवायला मिळत आहे. एकीकडे काही ठिकाणी उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक हैराण झाले तर दुसरीकडे वादळी पावसाने अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना त्रस्त करून सोडलं आहे. आजही राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर जळगावात आठवड्याभरात उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता हवामान अभ्यासकांकडून वर्तविण्यात आला आहे.

उत्तर, दक्षिणेकडून हवामानात झालेल्या बदलामुळे गेल्या दोन तीन दिवसांपासून जळगाव शहर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस पडला. यानंतर मंगळवारी आभाळ स्वच्छ असल्यामुळे पुन्हा तापमान चाळिशीपार गेले. अर्थात, सोमवारच्या तुलनेत ते चार अंशांनी वाढले.

मंगळवारी शहराचे तापमान ४०.८ अंशांवर होते. आता २४ ते २७ एप्रिल दरम्यान, कमाल तापमान ४० ते ४२ अंश दरम्यान राहण्याची शक्यता आहे. या काळात जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. मात्र २७ एप्रिलनंतर पुन्हा उष्णतेच्या लाटेचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे एप्रिलचा शेवट आणि मे महिन्याची सुरुवात ही अत्यंत तापदायक राहण्याचा अंदाज आहे. रविवारी व सोमवारी असलेले ढगाळ वातावरण मंगळवारी पूर्णपणे निवळल्याने तापमान वाढून उकाडा असह्य झाला

आज राज्यात कुठे ऊन, तर कुठे पाऊस
भारतीय हवामान विभागाने आज ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट दिलेला आहे. तर नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.