जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२५ । जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जवळपास २८ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. या घटनेने देशभरात संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान मृतांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, ओडिसासह इतर राज्यातील पर्यटकांचा समावेश असून यात भारतीय नौसेनेचे लेफ्टनंट विनय नरवाल हे देखील शहीद झाले.

विनय नरवाल हे करनाल येथील सेक्टर 7 मध्ये राहणारे होते. दोन वर्षांपूर्वीच ते नौदलात रूजू झाले होते. तर विनय नरवाल यांचे ३ दिवसापूर्वीच लग्न झाले होते. यानंतर हे जोडपे सोमवारी श्रीनगर येथे पोहचले. तेथून ते पहलगाम येथे फिरायला गेले होते. जिथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात त्यांची पत्नी वाचली. या घटनेनंतर त्यांच्या पत्नीचा, पतीच्या मृतदेहाशेजारी बसलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
मलाही गोळ्या घाला…; शुभमच्या पत्नीचा आक्रोश
शुभमचे वडील संजय द्विवेदी हे सिमेंटचे व्यापारी आहेत. शुभम आज जम्मू आणि काश्मीरहून घरी परतणार होता. जेव्हा दहशतवादी शुभमला मारत होते, तेव्हा त्याच्या पत्नीने दहशतवाद्यांना तिलाही मारण्यास सांगितले, परंतु दहशतवाद्यांनी सांगितले की ते तिला मारणार नाहीत. आम्ही तुम्हाला जिवंत सोडत आहोत जेणेकरून तुम्ही जाऊन तुमच्या मोदी सरकारला आम्ही काय केले आहे ते सांगू शकाल.
दरम्यान , शहीद लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या शेजारी राहणारी सीमा म्हणाली, “विनयचे लग्न फक्त तीन दिवसांपूर्वीच मोठ्या थाटामाटात झाले. हे सेलिब्रेशन १० दिवस चालले. तो खूप गोड मुलगा होता – मी त्यांच्या शेजारी राहते. त्यांनी इंजिनिअरिंग केले आणि नंतर क्लास वन ऑफिसर होण्यासाठी नेव्हीची परीक्षा उत्तीर्ण केली. ते स्वित्झर्लंडमध्ये त्यांचा हनिमून घालवण्याचा विचार करत होते, पण जेव्हा त्यांना रजा मिळाली नाही तेव्हा ते काश्मीरला गेले. हे सर्व अचानक घडले, जणू कोणीतरी त्यांच्यावर वाईट नजर टाकली आहे.
दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात आले होते..
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांनी बनावट गणवेश परिधान केले होते, त्यामुळे सुरुवातीला कोणत्याही पर्यटकाला त्यांच्यावर संशय आला नाही. पण काही वेळाने, जेव्हा त्यांनी हिंदू पर्यटकांची ओळख विचारली आणि त्यांच्यावर गोळीबार सुरू केला, तेव्हा घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. दहशतवाद्यांनी हिंदू पुरुषांना लक्ष्य केले. या हल्ल्यात डझनभराहून अधिक लोक जखमी झाले आहेत, ज्यांवर उपचार सुरू आहेत.