भारतीय दलित पँथरचे पहिले शहराध्यक्ष सुरेश अडकमोल यांचे निधन
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । भारतीय दलित पॅथरचे पहिले जळगाव शहर अध्यक्ष सुरेश अडकमोल यांचे वयाच्या ७६ वर्षी वृद्धपाकाळने निधन झाले.
सुरेश अडकमोल हे १९७३ साली भारतीय दलित पॅथरचे पहिले शहर अध्यक्ष होते. ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व माजी मंत्री सुरेश जैन यांचे कट्टर समर्थक होते. त्यांनी नामदेव ढसाळ, राजा ढाले, शांताबाई दाणी, भाई संगारे, रा.सु. गवई, अरुण कांबळे, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, चंद्रकांत हंडोरे, प्रितमकुमार शेगांवकर, गंगाधर गाढे यांच्या सोबत आंबेडकरी चळवळीत उभे आयुष्य काम केले. त्यानंतर ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हा सरचिटणीस होते. १९९३ साली ते राज्य परिवहन मंडळावर सदस्य होते तसेच शासकीय पुरवठा दक्षता समितीवर देखील त्यांनी काम केले होते. २० फेब्रुवारी १९८२ साली त्यांनी शहरातील समतानगर ही वस्ती बसवून सर्व जाती धर्माच्या लोकांना राहण्यासाठी जागा देऊन गोरगरीबांचा निवाऱ्याचा प्रश्न मिटवला होता. औरगाबाद मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनात त्यांनी नाशिक, औरंगाबाद, अकोला, बुलडाणा, जळगाव आदी ठिकाणी कारावास भोगला होता.
ते रेशन दुकानदार संघटनेचे तथा आरपीआयचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांचे वडिल तर आरपीआयचे जिल्हा सचिव भरत मोरे यांचे सासरे होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.