जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२२ । जगभरातील नेटकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होऊन बसलेल्या व्हॉट्सॲपची बत्ती गेल्या दीड तासापासून गुल झाली आहे. व्हॉट्सॲप सोशलमीडिया प्लॅटफॉर्म डाऊन झाले असल्याने भारतासह अनेक देशात वापरकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आहे. दरम्यान, सर्व्हर डाऊन होण्यामागे नेमके कारण काय आहे, हे अद्याप समजू शकले नसले तरी त्यावर काम सुरु असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, व्हॉट्सॲप डाऊनहोताच ट्विटरवर ट्रेंड सुरु झाला असून मिम्सचा पाऊस पडत आहे.
जगात लोकप्रिय असणारे मेसेंजिग ॲप म्हणजेच व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना दुपारी साधारणतः १२ वाजून ७ मिनिटांनी संदेश पाठविण्यास अडचण येऊ लागली. काहींनी सर्व्हर अचानकपणे बंद पडल्याचे म्हटले आहे. सर्व्हर बंद पडल्यामुळे सगळ्या सुविधा बंद झाल्या आहेत. मेसेजिंग, व्हिडीओ कॉल, ग्रूप चॅट, ही सर्व फिचर्स सध्या बंद पडली आहेत. हा प्रकार साधारणपणे गेल्या दीड ते दोन तासापासून जाणवत आहे. व्हॉट्सॲप नवे मेसेज सेंड आणि रिसिव्ह होत नाहीय. त्याचबरोबर व्हॉट्सॲप स्टेटसही अपलोड होण्यास अडचणी येत आहे.
ट्विटरवर व्हॉट्सॲप डाऊनचा ट्रेण्ड
व्हॉट्सॲप अचानकपणे बंद पडल्यामुळे ट्विटरवर व्हॉट्सॲप डाऊनचा ट्रेण्ड सुरु झाला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा यामागचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही. व्हॉट्सॲपचे सर्व्हर डाऊन झाल्यानंतर ट्विटरवर अनेकांनी ट्विट करत सर्वांना तशाच अडचणी येत आहेत का? अशी शंका विचारली. अवघ्या काही क्षणात ट्विटरवर या संदर्भात इतके ट्विट आले की हा मुद्दा ट्विटरवर ट्रेंड करायला लागला आहे. ट्विटर आणि इतर प्लॅटफॉर्मवर #WhatsAppDown हॅशटॅगसह एक मेम फेस्ट सुरू झाला. बर्याच वापरकर्त्यांनी सांगितले की त्यांना प्रथम वाटले की त्यांची इंटरनेट सेवा ही समस्या आहे.
जगभरात 2 अब्जाहून अधिक वापरकर्ते संप्रेषण आणि पेमेंटसाठी WhatsApp वर अवलंबून असतात. इटली आणि तुर्कीमधील सोशल मीडिया वापरकर्त्यांनी देखील संदेश पाठविण्यास सक्षम नसल्याबद्दल पोस्ट केले. संपूर्ण यूकेमधील वापरकर्त्यांसाठी मेसेजिंग सेवा बंद आहे, असे वृत्त बीबीसीने दिले आहे. कंपनीने सांगितले की, ते परत आणण्यासाठी आम्ही काम करत आहे. “आम्हाला माहिती आहे की सध्या काही लोकांना संदेश पाठवण्यात समस्या येत आहेत आणि आम्ही शक्य तितक्या लवकर प्रत्येकासाठी WhatsApp पुनर्संचयित करण्यासाठी काम करत आहोत,” असे Meta चे प्रवक्ते म्हणाले.