हवामानात होणार मोठा बदल! आगामी तीन महिन्यात देशात सरासरी पावसाचा अंदाज, जळगावातील हवामान पहा..
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२५ । गेल्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये हवामानात बदल पाहायला मिळाला. एकीकडे राज्यात थंडीचा जोर वाढू लागला असताना अवकाळी पावसाच्या सावटामुळे थंडी गायब झाली. अन् जळगावसह अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र आता अवकाळीचा ढग निवळले असून रात्रीच्या तापमानात घट होताना दिसत आहे. परंतु हवामानात पुन्हा बदल पाहायला मिळू शकतो. कारण जानेवारी ते मार्च महिन्यांतील पावसाचा तसेच जानेवारी महिन्यातील पाऊस आणि तापमानाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला.
त्यानुसार शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी माहिती समोर आलीय. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशाच्या बहुतांशी भागात सरासरी इतका अवकाळी पाऊस (८८ ते ११२ टक्के) पडण्याची शक्यता आहे. विशेष महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. या हवामान बदलाचा रब्बी हंगामातील पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
जानेवारी महिन्यात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याने देशात थंडी कमी राहणार आहे. मात्र उत्तर महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशात थंडीच्या लाटांचा कालावधी अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
जळगावातील तापमानात घट:
गेल्या काही दिवसापूर्वी रात्रीचं तापमान १९ अंशापर्यंत गेलं होते. मात्र या आठवड्यात अत्यंत मोठी घट झालीय. जळगावचे रात्रीचे तापमान १३ अंशापर्यत घसरले आहे. तर दिवसाचे तापमान २८ अंशापर्यंत आहे. दरम्यान रात्री आणि सकाळी थंडीचा कडाका जाणवत असून मात्र दुसरीच्या वेळेस उन्हाचा चटका अंगाला बसत आहे. आगामी दिवसात तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज आहे.