जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२४ । एकीकडे शेतात पिकविलेल्या पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय. यातच नवीन वर्षाच्या आगमनासोबत शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक चिंताजनक बातमी आहे. ती म्हणजे १ जानेवारी २०२५ पासून रासायनिक खतांच्या (chemical fertilizers) दरात २०० ते ३०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.
या खतांच्या किमतीत वाढ?
डीएपी – DSP (डाय-अमोनियम फॉस्फेट), टीएसपी-TSP (ट्रिपल सुपर फॉस्फेट), १०:२६:२६ आणि १२:३२:१६ या खतांच्या किमतीत वाढ होणार आहे. आधीच खरीप हंगामातील नुकसानीची भरपाई करणे शेतकऱ्यांसाठी एक आव्हान बनले असताना, त्यातच रासायनिक खतांच्या किमतीतील वाढ शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी आहे.
शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ
शेतीच्या उत्पादन खर्चात दरवर्षी वाढ होत आहे, यात रासायनिक खतांची भूमिका आणखी महत्वाची असते. रासायनिक खते शेतीच्या उत्पादनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, परंतु त्याच्या किमतीत सततच्या वाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. युरियानंतर देशात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वापरला जाणारे खत असलेल्या डी.ए.पी.च्या एका बॅगचे वजन ५० किलो असते. जागतिक बाजारात या घटनांचे दर वाढल्याने खतांचे दर वाढविण्यात येत असल्याची माहिती समोर आलीय.
खताचा प्रकार मागील दर होणारी दर वाढ (प्रति ५० किलो बॅग)
१०:२६:२६ : सध्याचे दर १४७०.. वाढीव दर १७२५, प्रति बॅग मागे २५५ ची वाढ
१२:३२:१६ : सध्याचे दर १४७०… वाढीव दर १७२५, प्रति बॅग मागे २५५ ची वाढ
डी. ए. पी. : सध्याचे दर १३५०… वाढीव दर १५९०, प्रति बॅग मागे २४० ची वाढ
टी. एस. पी. : (४६ टक्के) सध्याचे दर १३००… वाढीव दर १३५०, प्रति बॅग मागे ५० ची वाढ