⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

सर्वसामान्यांना महागाईचा फटका ; डाळींच्या किंमती कडाडल्या, आताचा प्रतिकिलोचा दर किती?

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२४ । सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा रणधुमाळी सुरु असून या काळात कोणत्याही प्रकारची महागाई होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. महागाई नियंत्रीत करण्यासाठी विविध प्रकारची धोरणं देखील आखत आहे. मात्र, काही वस्तूंची महागाई काही कमी होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांत तूरडाळ आणि मूगडाळींच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता नागरिकांना डाळ खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

तूरडाळ जवळपास १५ रुपये तर मूगडाळ १० रुपयांनी महाग झाली आहे. गेल्या काही दिवसात बाजारात तुरडाळ आणि मूगडाळीची मागणी वाढत आहे. त्यामुळेच डाळीच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळं सामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसतेय.

तुरडाळीचे नवीन पीक नोव्हेंबर महिन्यात येते. यंदा हे पीक सात टक्के जास्त आले आहे. मात्र, बाजारातील वाढत्या मागणीमुळे तुरडाळीच्या किंमती वाढवण्यात आल्या आहे. राज्यातील सर्वाधिक डाळीचे उत्पादन हे अकोला, मराठवाडा आणि यवतमाळ येथे घेतले जाते. डाळींचे दर वाढल्यामुळे केंद्र सरकारने सर्व विक्रेते, गोदाम मालकांना त्यांच्याकडील तूरडाळीचा साठा घोषित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विक्रेत्यांना लवकरच साठा मर्यादा लागू होण्याची शक्यता वर्तवली आहे.

मार्च महिन्यात तूरडाळीचा घाऊक दर हा १२० ते १४० रुपये होता. हा दर आता वाढवला असून १४० ते १७० रुपये झाला आहे. किरकोळ दर १४० रुपयांवरुन १७० ते १९० झाला आहे. तर मूगडाळीचे घाऊक दर ९० ते १०० रुपयांवरुन ११० ते १२० रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात मूगडाळीचा दर १४० रुपये प्रतिकिलो झाला आहे.