जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२४ । हिवाळ्याच्या दिवसांत थंडी वाढत असताना, अंडी खाणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. यामुळे अंड्याची मागणी वाढली आहे आणि त्याचा परिणाम अंड्याच्या दरात झाला आहे. अलिकडच्या काळात, किरकोळ बाजारात ३० अंड्यांचा कॅरेट १६० रुपयांना मिळत होता, मात्र आता हा दर १९० रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे प्रत्येक अंड्याच्या किमतीत एक रुपयाची वाढ झाली आहे.
महागाईचा फटका सामान्य जनतेला बसत आहे आणि जीवनावश्यक वस्तूंवर देखील महागाईचे झळे बसत आहेत. हिवाळ्यात अंड्याची मागणी वाढल्याने त्याचे दर देखील वाढत आहेत. पूर्वी ६ रुपयांना मिळणारे एक अंडे आता ८ रुपयांना विकले जात आहे, तर ७२ रुपयांना मिळणारी डझन अंडी आता ९६ रुपयांना विकली जात आहेत. या दरवाढीमुळे सामान्य जनतेवर आर्थिक भार वाढणार आहे.
गेल्या वर्षी पाच ते सहा रुपयांना नग मिळणारे अंडे गेल्या महिन्यात सात रुपयांना मिळत होते, आता ते आठ रुपयांना झाले आहेत. कोंबड्यांचे खाह्य महागल्याने देखील अंड्याचे दर वाढले आहेत. अजून किमान अडीच महिने ही दरवाढ राहणार आहे, असे सांगितले जात आहे. सामान्य लोकांसाठी अंड्यांच्या दरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.
अंड्याच्या दरवाढीचा थेट परिणाम हॉटेल्स आणि टपऱ्यांवर होणार आहे. ऑम्लेट, अंडाभुर्जी, अंडा-करी यांसारखे पदार्थ विकणाऱ्या दुकानदारांना उत्पादन खर्च वाढल्यामुळे त्यांच्या पदार्थांचे दर वाढवावे लागतील. परिणामी, सामान्य ग्राहकांना या पदार्थांसाठी अधिक पैसे मोजावे लागतील. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे सामान्य लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. हिवाळ्याच्या दिवसांत शरीराला आवश्यक प्रथिनांसाठी अंडी खाल्ली जातात, त्यामुळे अनेकांना आपल्या आहारात बदल करावा लागणार आहे.