जिल्ह्यात खरेदी, विक्री व्यवहारात वाढ ; शासनाच्या तिजोरीत भर
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । गेल्या दोन अडीच वर्षात कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर जिल्ह्यात मागील वर्ष तसेच चालू खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे पाहावयास मिळत आहे. मुद्रांक शुल्क वसुलीत देखील ३४ कोटींनी वाढ झाली आहे.
शासनाने जिल्ह्याला प्रारंभी २४० कोटी रुपये मुद्रांक शुल्क वसुलीचे उद्दिष्ट दिलेले होते. फेब्रुवारी महिन्यात उद्दिष्ट १४ कोटींनी कमी करून २२६ कोटींचे देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात मार्चअखेर खरेदी-विक्रीचे ८६ हजार ४६६ दस्त नोंदवण्यात आले. त्यामधून २२९ कोटी रुपयांची मुद्रांक शुल्क वसुली झाली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जिल्ह्यातील मुद्रांक शुल्क वसुलीचे उद्दिष्ट सन २०१९-२० च्या (२१४ कोटी) तुलनेत सन २०२०-२१ मध्ये उद्दिष्ट ४२ कोटींनी कमी (१७२ कोटी) करण्यात आलेले होते. उद्दिष्टानुसार खरेदी-विक्रीच्या व्यवहारांसाठी दस्त नोंदणीत ८ हजारांवर वाढ झाली. मुद्रांक शुल्क वसुलीतही ११३.८९ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली; मात्र उद्दिष्ट घटवल्यानंतरही सन २०१९- २०२० च्या तुलनेत २०२०-२०२१ मध्ये मुद्रांक शुल्क वसुलीत २३.६३ कोटींची घट नोंदवण्यात आली होती. सन २०२० मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना महामारीला प्रारंभ झाला होता. त्यानंतर पहिला लॉकडाऊन करण्यात आला. दुय्यम निबंधक कार्यालये बंद होती. ५ मे रोजी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू झाली. त्यानंतर दस्त नोंदणीला सुरुवात झाली. सन २०१९-२०२० मध्ये जिल्ह्याला २१४ कोटी रुपये मुद्रांक शुल्क वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या वर्षी खरेदी-विक्रीच्या व्यवहाराचे ७५ हजार ३३६ दस्त नोंदवण्यात आले. त्या माध्यमातून २१९.५२ कोटींचे मुद्रांक शुल्क शासनाला मिळाले. राज्य शासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी खरेदीदारांना मालमत्तांच्या व्यवहारांसाठी प्रोत्साहन देऊन रिअल इस्टेटलाही चालना देण्यासाठी १ सप्टेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कात ३ टक्के तर १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत २ टक्के सवलत देण्यात आली. त्यानंतरही मुद्रांक शुल्क भरणाऱ्यांना दस्त नोंदणीसाठी पुढील चार महिन्यांची मुभा देण्यात आली होती. सवलतीमुळे सन २०२०-२१ मध्ये मुद्रांक शुल्क वसुलीत वाढ नोंदवण्यात आली. या वर्षी १७२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले. खरेदी-विक्री व्यवहाराची ८३ हजार ८४४ दस्त नोंदणी होऊन १९५ कोटींचा मुद्रांक शुल्क वसूल झाला. उद्दिष्टाच्या तुलनेत मुद्रांक शुल्क वसुलीत १०२.५८ टक्के वाढ झाली आहे.