२२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन संपन्न : जिल्ह्यातील ४३ संघांचा सहभाग
जळगाव लाईव्ह न्यूज । बालकलावंतांना घडविणारी, त्यांच्यातील कला गुणांचा विकास करणारी राज्य बालनाट्य स्पर्धा ही देशातील एकमेव बालकलावंतांसाठी चालणारी चळवळ असून, महाराष्ट्र शासनाद्वारे गेल्या २१ वर्षापासून ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. १९७९ साली जळगाव जिल्ह्यात पहिले बालनाट्य करणारे ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील यांच्याकडे बालनाट्य करत मोठा झालेला बालकलावंत या स्पर्धेच्या उद्घाटनाला उद्घाटक म्हणून हजर राहतो.

हे बालकलावंतांच्या एका पिढीचे वर्तुळ पूर्ण झाले असून, प्रेक्षकात बसलेला बालप्रेक्षक येत्या काळात या स्पर्धेला उद्घाटक म्हणून उपस्थित राहील तेव्हा या स्पर्धेचे खरे यश असेल, असे प्रतिपादन बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीचे प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल यांनी केले. २२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

आज (दि.२०) शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात २२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. उद्घाटन सोहळ्याला उद्घाटक म्हणून बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईचे प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल, हास्यजत्रा फेम अभिनेते हेमंत पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, प्रा.राजेंद्र देशमुख, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ सदस्या गीतांजली ठाकरे यांच्यासह परीक्षक डॉ.अमजद सैय्यद (बीड), वनिता जीवने (नागपूर), प्रा.प्रदीप कांबळे (छत्रपती संभाजीनगर), स्पर्धेचे समन्वयक प्रा.संदीप तायडे, सहसमन्वयक नितीन तायडे, सुभाष गोपाळ आदी उपस्थित होते. नटराजपूजन, दीपप्रज्वलन केल्यानंतर, घंटानाद करून स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. सोहळ्याचे सूत्रसंचालन मानसी नेवे यांनी तर आभार नितीन तायडे यांनी मानले.
जळगाव जिल्ह्यातील ४३ संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून, दि. २० जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान रोज ६ बालनाट्यांचे सादरीकरण या स्पर्धेत होणार आहे. तरी या बालनाट्यांचा आस्वाद बालकलावंत, पालक, शिक्षक यांनी घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे व समन्वयक प्रा.संदीप तायडे यांनी केले.



