पत्नीसह मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीस आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२४ । पत्नीसह अल्पवयीन मुलीला इंजेक्शनमधून केटामाइन हे विषारी औषध देऊन खून करणाऱ्या आरोपीस कोर्टाने आजन्म सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे. सचिन गुमानसिंग जाधव असे या आरोपीचे नाव असून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जे. जे. मोहिते यांनी हे आदेश दिले आहे.
खटल्याची हकिगत अशी की, सचिन जाधव हा रिंगरोडवरील एका रुग्णालयात १७ वर्षांपासून काम कंपाउंडर म्हणून कामाला होता. तसेच रुग्णालयातच पत्नी व मुलीसोबत राहत होता. त्याने २०१६ रोजी पत्नी कविता (वय ३४) व मुलगी रिनाक्षी (क्य १४) या दोघांना इंजेक्शनातून केटामाइन हे विषारी औषध देऊन खून केल्याप्रकरणी तुषार राजपूत याच्या फिर्यादीवरून सचिनसह त्याचे आई, वडील, मोठा भाऊ, वहिनी या पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या खटल्यावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. जे. यांच्या कोर्टात अंतिम सुनावणी झाली. घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार नसल्याने खटल्यात २४ साक्षीदार तपासण्यात आले.
यात डॉक्टर, भूलतज्ज्ञ, केटामाइन औषध वितरक आरोपी हा रुग्णालयात असल्याचा पुरावा म्हणून रात्री १२ वाजता ज्या रुग्णाची सलाइन बंद केली तो रुग्ण, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आदी परिस्थितीजन्य पुराव्यांसह मृतांच्या अंगावरील झटापटीत झालेल्या जखमांमुळे त्यांनी आत्महत्या केली नसल्याचे पुरावे कोटनि ग्राह्य धरून सचिन जाधव याला दोषी धरून खुनाच्या गुन्ह्याखाली आजन्म सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील उर्वरित संशयित हे घटनास्थळावर असण्याबाबत पुरावा आढळून न आल्याने त्यांची निदर्दोष मुक्तता केली. सरकारतर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता नीलेश चौधरी यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. आर. एस. सोनवणे व हर्षल राजपूत यांनी सहकार्य केले. तर पैरवी अधिकारी चेतन ठाकरे यांनी काम पाहिले.