जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ आलं. याच शिवसेनेच्या ४० आमदारांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटात एकत्र येत नवीन सरकार स्थापन करणार असून मंत्रिपदं, खातेवाटपबाबतही ठरलं गेलं असल्याचे सांगितले जातेय. मात्र अशातच एकनाथ शिंदे यांनी महत्वाचं ट्विट आहे. “भाजपसोबत मंत्रिपदांबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका”, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून शिंदे गटाच्या आमदारांसह राज्यातील जनतेला केलं आहे.
एकनाथ शिंदे यांचं ट्विट
मंत्रिपदं, खातेवाटप आणि भाजपसोबतची चर्चा याविषयी एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे. “भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका”, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा दाखला दिला आहे. “वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस”, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.