जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । गेल्या चार दिवसांपासून (Maharashtra) राज्यात पाऊस सक्रीय झाला असून अनेक ठिकाणी धोधो पाऊस बरसत आहे. काेकण आणि मुंबईत अतिवृष्टी हाेत असतांना आता मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील पावसाने जाेर पकडला आहे. दरम्यान, येत्या दाेन दिवसांमध्ये खान्देशात अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट तर रविवार आणि साेमवारी मुसळधार पावसाचा यलाे अलर्ट देण्यात आला आहे.
कोकणात दाखल झालेल्या मान्सूनला राज्य व्यापण्यासाठी महिन्याचा कालावधी गेला असला तरी पावसाचा जोर मात्र, कोकण आणि मुंबईवरच राहिलेला आहे. जून महिन्यात सरासरी एवढा पाऊस केवळ कोकणात झाला होता. जून महिन्यात जळगाव जिल्ह्यात देखील पावसाने पाठ फिरवली होती. गेल्या महिन्यातील मध्यंतरी पावसाने काहीशी हजेरी लावली होती, मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली होती.
मात्र आता कुठे वरुणराजाने जिल्ह्यासह राज्यात हजेरी लावली आहे. या महिन्यातील पहिला आठवडा समाधानकारक पावसाचा राहिला आहे. जिल्हाभरात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हाेत आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये जळगाव तालुक्यात दाेन वेळा दमदार पाऊस झाला आहे. हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी देखील जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
खरीप पेरणीला पोषक वातावरण
आतापर्यंत मर्यादित क्षेत्रावर बरसत असलेल्या वरुणराजाने आता महाराष्ट्र व्यापाला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून असलेले सातत्य सात दिवसांपासून कायम आहे. त्यामुळे खरीप पेरणीसााठी आवश्यक असलेला पाऊस जवळपास सर्वच विभागात झाला आहे. त्यामुळे रखडलेल्या पेरणी कामे मार्गी लागत आहेत. उशिरा का होईना दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समधान व्यक्त होत आहे.