जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२२ । राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण राज्यात परतीचा पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे. राज्यातून पाच ते दहा ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मागील गेल्या दोन दिवसात जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. अशातच आज देखील जळगावसह (Jalgaon District) राज्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. Rain Alert In Jalgaon
जिल्ह्यात उद्या परतीच्या मान्सूनचे आगमन?
दरम्यान, परतीचा मान्सून राजस्थानात रेंगाळल्यामुळे त्याचा परतीचा प्रवास तीन दिवस उशिराने सुरु झाला. खान्देशात ५ पर्यंत मान्सून परतीच्या प्रवासाला येण्याची शक्यता होती मात्र, आता उद्या ८ ते ९ ऑक्टोबरदरम्यान, जळगाव जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अदांज वर्तविण्यात आला आहे.मात्र त्यापूर्वी काल गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यात काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. चाळीसगाव परिसरातही मुसळधार पाऊस झाला. अशातच आता आज जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह पाऊस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असून नद्यांवरील लहान व मोठे प्रकल्पांचा धरणसाठा 100% पुर्ण भरलेला आहे. त्यामुळे सर्व लहान व मोठे धरणांच्या खालील तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नदीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शेतकरी व नदीकाठच्या गावातील नागरीकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल अशा शेतमालाचे नुकसान होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. परतीचा पाऊस विजांच्या कडकडाटांसह कोसळणार असल्याने पावसा दरम्यान विजा व अतिवृष्टी पासुन बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा तसेच याप्रसंगी झाडाखाली वीजवाहिनी अथवा ट्रान्सफार्मर जवळ थांबू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
आज राज्यातील या भागांना इशारा?
दरम्यान, आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात जोरदार पावसाचा इशारा आहे. तर मध्य महाराष्ट्रतील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर. विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
जळगांव जिल्हा, 7/ 10/2022
अमळनेर-
बोदवड-16
भडगाव-
भुसावळ-5.6
पाचोरा-68
पारोळा-13
जामनेर-14
चोपडा-40
चाळीसगाव-22
रावेर-5
मुक्ताईनगर-3
धरणगाव-23
यावल-0
एरंडोल-34
जळगाव-0