जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२४ । एकीकडे राज्यातील काही भागात उन्हाचा चटका वाढला असून दुसरीकडे अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळत असून अशातच हवामान खात्याने पुढील २४ तासांत पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. आज काही जिल्ह्यांमध्ये यलो तर काहींमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गारपिटीचीही शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी शेतमालाची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
आज नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे. तर याशिवाय इतर अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट असून विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्याही परस्थिती काहीशी अशीच राहील. बुधवारीही अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे
गुरुवारपासून पावसाचा जोर काही प्रमाणात कमी व्हायला सुरुवात होईल. तर, शुक्रवारनंतर अवकाळी पाऊस निरोप घेईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या अवकाळी पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.
उर्वरित राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान असून इतर ठिकाणी उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे पुढील काही दिवस तापमान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे.