जळगावसह पाच जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा ; हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२३ । शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून माहित हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.
अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा वाढल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे. तर राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडत आहेत. आज (ता. 29) उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तर विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर पुणे, नगर, जालना, बीड जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, ढगाळ हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानही वाढ झाली आहे. शनिवारी (ता. 28) पुणे येथे राज्यातील नीचांकी 11.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान 11 ते 20 अंशांच्या दरम्यान आहे. परंतु दुपारच्या दरम्यान उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. ढगाळ हवामानामुळे दुपारच्या वेळी राज्यात उकाडा जाणवत आहे.
सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी 34.4 अंश सेल्सिअस तापमान नोंद झाली. याचबरोबर अग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागूनच चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली ठळक होत असून, बुधवारपर्यंत (ता. 1) श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत येण्याचे संकेत आहेत.