⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

राज्यात पावसाची दडी ; कधी परतणार पाऊस? IMD व्यक्त केला ‘हा’ अंदाज..

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२३ । राज्यात जून महिन्यात पावसाने बरीच प्रतीक्षा करायला लावली. जूनच्या शेवटची राज्यातील काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली त्यांनतर जुलै महिन्यात राज्यातील बहुतांश भागात धोधो पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली होती.जुलै महिन्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने बळीराजानेही खरीप हंगामातील कामे देखील आटोपून टाकली. मात्र, ऑगस्ट महिना सुरू होताच राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे.

या तारखेपर्यंत पावसाची विश्रांती?

ऑगस्ट महिन्यात राज्यात सर्वसाधारण पाऊस होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने दडी मारली आहे. अजून राज्यात पावसाचा ब्रेक असणार आहे. पावसाची ही विश्रांती २० ऑगस्टपर्यंत असणार आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

या जिल्ह्यात अजून पावसाची प्रतिक्षा

गेल्या दोन महिन्यात राज्यातील काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला. मात्र अद्यापही काही ठिकाणी हवा तास पाऊस झाला नाहीय. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, नांदेड या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. तर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात सामन्यापेक्षाही कमी पाऊस झाला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली आहे. परंतु सातारा, सांगली, नगर, औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, अकोला, जळगाव या जिल्ह्यात अजून पावसाची प्रतिक्षा आहे. राज्यात २० ऑगस्टनंतर पाऊस परतण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे.

दरम्यान, राज्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आता येत्या काही दिवसांत पाऊस बरसला नाही तर शेतकऱ्यांचे मोठा आर्थिक नुकसान होणार आहे.