जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२५ । जळगावसह राज्यात सूर्य आग ओकत असल्यामुळे राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे.एकीकडं उन्हाचा चटका वाढल्यामुळे अंगाची लाही लाही होत असताना हवामान खात्याकडून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जळगावात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली. ४० अंशावर असलेले तापमान ३८ अंशापर्यंत घसरले आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यात आगामी तीन ते चार दिवस काही अंशी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत होती, तापमानाचा पारा ४० अंशापर्यंत गेल्याने जळगावकर उष्णतेमुळे हैराण झाले. सकाळी ९ वाजल्यापासून उन्हाचा चटका जाणवत आहे. तर दुपारच्या वेळेस सूर्य आग ओकत असल्याचं जाणवत आहे. मात्र यातच वातावरणात बदल होऊन जळगाव शहरात जिल्ह्यात वाहत असलेल्या वेगवान वाऱ्यांमुळे तापमानात काही प्रमाणात घट झालेली पाहायला मिळाली.
शुक्रवारी ४० अंशावर असलेले तापमान एक-दोन अंशाने कमी झाले होते. काल रविवारी कमाल ३८.५, तर किमान २२.५ अंश तापमानाची नोंद झाली. दरम्यान, वातावरणात होत असलेल्या बदलाचा परिणाम म्हणून आगामी तीन ते चार दिवस जिल्ह्यात काही अंशी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर, जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे. रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरु असून यातच पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे..
राज्यातील स्थिती?
दरम्यान एकीकडे सूर्य आग ओकत असून दुसरीकडे राज्यावर अवकाळी पावसाचे संकट ओढावले आहे. बुधवारपासून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात बुधवारपासून विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.तर विदर्भात आज पाच जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.