जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२२ । महाराष्ट्रात गेल्या महिन्यात पावसाने थैमान घेतले होते. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याचं चित्र आहे. अशात हवामान खात्याकडून पावसाचा नवा अंदाज देण्यात आला आहे. येत्या चार दिवसांत राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच जळगाव जिल्ह्याला आजपासून पुढील तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत काही दिवसांपासून अतिशय उष्ण, दमट हवामान आहे. पाऊस नसल्याने व आर्द्रतेची उच्च पातळी असल्याने अस्वस्थता निर्देशांक (DI) खूप जास्त आहे. मुंबईकर पावसाची वाट पाहत असले तरी रविवारपर्यंत हवामानात कोणताही बदल होणार नाही. तर येत्या २,३ दिवसात मुंबईत पावसाची शक्यता असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. इतकंच नाहीतर तोपर्यंत आरोग्याची काळजी घ्या व स्वत:ला हायड्रेट ठेवा, अशाही सूचना देण्यात आल्या आहे.
गेल्या महिन्यात राज्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं होते. पावसाचा जोर जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कायम राहिल्यामुळे शेतकर्यांची पेरणीलाही सुरुवात केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत राज्यात पावसानं दडी मारल्यामुळे सगळ्यांना उकाड्याचा सामना करावा लागला आहे. मात्र येत्या चार दिवसांत राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक सरींसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, आज दुपारी जळगाव जिल्ह्यातील काही भागात तुरळक पाऊस झाला आहे. आजपासून पुढचे तीन दिवस जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.