जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । शहरासह जिल्ह्यावर पुन्हा कोरोनाचे सावट पसरले असून ते अधिकच गडद होत आहे. गेल्यावर्षीच्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊन असो वा नसो जिल्ह्यात एका गटाची मात्र चांगलीच चंगळ आहे. जिल्ह्यात अवैध सावकारी धंदा चांगलाच फोफावला असून गरिबांची अडचण लक्षात न घेता बिनधास्तपणे वसुलीचे काम सुरू आहे. पोलीस आणि सहकार विभागातील काही दिग्गजांना याबाबत माहिती असून देखील याकडे कानाडोळा केला जात आहे.
जळगावात सध्या अवैध धंदे मोठ्याप्रमाणात फोफावले असून सर्वच आलबेल कारभार सुरू आहे. कुठे सट्टा बाजार जोरात तर कुठे अंमली पदार्थांची जोरदार विक्री. सर्वांना परिचित आणि कायम चर्चेत असलेल्या या अवैध धंद्याव्यतिरिक्त आणखी एक धंदा सध्या मोठ्याप्रमाणात वाढला आहे. अवैध सावकारी जिल्ह्यात प्रचंड वाढली असून सावकारांची मुजोरी देखील वाढली आहे.
२ ते २० टक्के दरमहा व्याजाने पैसे वाटप
जळगाव जिल्ह्यात २ ते २० टक्के दरमहा व्याजाने पैसे वाटप केले जात आहे. उद्योजक, व्यावसायिक आणि राजकारणी लोकांमध्ये लाखोंचे व्यवहार २ टक्केच्या दराने नेहमी होत असतात. परंतु इतरांच्या बाबतीत आणि किरकोळ रकमेसाठी मात्र चढा व्याजदर मोजावा लागतो. काही सावकार नोटरी, स्टॅम्प करून घेतात तर काही घर, मालमत्तेचे मूळ कागदपत्रे, कोरा धनादेश, वस्तू, वाहन गहाण म्हणून स्वतःकडे ठेऊन घेतात. ठरलेल्या दिवशी व्याज आणि ठरलेली रक्कम मिळाली नाही तर दुप्पट दंड वसूल केला जातो किंवा जवळ ठेवलेली वस्तू जबरदस्तीने बळकावून घेतली जाते.
सहकार, पोलीस विभागाचा कानाडोळा
जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्यात अवैध सावकारी प्रकरणी सहकार विभागाने जळगाव आणि कासोदा येथे छापा टाकत कारवाई केली होती. गेल्या अनेक वर्षात केवळ एकच कारवाई झाली आहे. आज जिल्ह्यात पावलापावलावर अवैध सावकार झाले असून पोलीस आणि सावकार विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. काही दिग्गज तर यांच्याच परिचयातील असल्याने तेच त्यांना पाठबळ देत असतात.
४ वर्षात भरले ६ लाख व्याज तरीही मुद्दल बाकीच
जळगाव शहरातील एका तरुणाने ४ वर्षापूर्वी अवैध सावकाराकडून ४ लाख व्याजाने घेतले होते. अवैध सावकाराने १० टक्के दराने ४ लाख उपलब्ध करून दिले. संबंधित तरुणाने आजवर नियमीत व्याज दिले. थोडे थोडके नव्हे तर ४ लाखाचे ६ लाख व्याज भरले. गेल्यावर्षी लॉकडाऊन लागल्याने तरुणाची आवक थकली आणि तो व्याज देऊ शकला नाही. व्याज नियमीत मिळत होते तोवर सावकारांना मज्जा वाटत होती मात्र लॉकडाऊनच्या काळात अडचण आल्याने ते समजून घेत नाही. सावकाराला तरुणाच्या अडचणीचे काहीही देणंघेणं नसून त्याने पैशांसाठी तगादा लावला आहे. सावकाराकडून तरुणाला धमक्या दिल्या जात असून व्याज आणि मुद्दल रकमेची मागणी केली जात आहे.
कर्ज घेणाऱ्याची पसरी अन सावकारांचा कुटुंबियांना त्रास
जळगाव शहरातीलच एका तरुणाने ओळखीतील काही अवैध सावकारांकडून ५ ते १५ टक्के व्याजाने पैसे घेतले होते. गेल्या वर्षी तरुणाने सर्वांना व्याज आणि काही मुद्दल नियमीतपणे परत दिली परंतु कौटुंबिक अडचणीमुळे पुढे त्याला पैसे देणे शक्य झाले नाही. व्याजाने पैसे दिलेल्या सावकारांनी त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला. आपली अडचण सावकार समजून घेत नसल्याने तरुणाने थेट पसरी खात पैसे येतील तेव्हा देईल अशी भूमिका घेतली. तरुण पैसे देत नसल्याने सावकार तरुणाच्या घरी फेऱ्या मारत असून त्याच्या कुटुंबियांना त्याच्याबद्दल व पैशांबद्दल विचारणा करीत आहे.