जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । शौक बडी चीज हैं.. असे नेहमी म्हटले जाते. शौक पूर्ण करण्यासाठी लोक वाट्टेल ते करायला तयार असतात मग पैसे उधार किंवा व्याजाने का घ्यावे लागेना. लोकांच्या गरजा वाढल्या तर दुसरीकडे महागाई वाढली त्यातच कोरोनाने आर्थिक कंबरडे मोडले. पैशांची आवक कमी आणि निकड वाढल्याने कसाही करून पैसा उभा करण्याची आवश्यकता भासली. गरजूंची नेमकी हीच नस ओळखून अनेक जण सावकारी धंद्यात उतरले. कोणताही परवाना नाही, फारशी गुंतवणूक नाही, जोखीम कमी आणि नफा भरगोस असा धंदा असल्याने अवैध सावकार बोकाळले. एखाद्या धंद्याच्या आड सुरु असलेला अवैध सावकारी (Illegal moneylender) व्यवसाय आज अनेकांच्या मुळावर येऊन बसला आहे. गेल्या महिनाभरात अनेक अवैध सावकारांच्या मुसक्या आवळल्या गेल्या असून त्यामुळे कितीतरी गरजुंना दिलासा मिळणार आहे.
देशात गेल्या काही वर्षात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक भरती प्रक्रिया खोळंबल्या आहेत. कोरोनाने बेरोजगारीत आणखीनच भर टाकली. काहींनी बेरोजगारीला कंटाळून व्यवसाय सुरु केले पण लॉकडाऊन लागला आणि ते देखील बुडाले. व्यवसाय सुरु करण्यासाठी काढलेले कर्ज, व्याजाने घेतलेले पैसे देखील न भरण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली. बेरोजगारांना बँक सुलभ पद्धतीने कर्ज देत नाही. त्यामुळे ते अवैध सावकार शोधतात आणि त्याच्याकडून व्याजाने पैसे घेतात. सुरुवातीला सर्व सुरळीत सुरु असताना अचानक व्याजाचा बोजा वाढत जातो आणि गरजू नैराश्याच्या दरीत जाऊ लागतो. पंधरा दिवसापूर्वी धुळे येथे एका विमा एजंटला अवैध सावकारी प्रकरणी अटक केल्यानंतर त्याच्याकडे करोडोंचे घबाड सापडले. शुक्रवारी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर प्रशासनाने छापेमारी केली. पुण्यातील बुधवार पेठेत देखील एका पानटपरी चालकाने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला २५ टक्के दराने पैसे दिल्याचे समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी देखील एरंडोल, जळगाव (Jalgaon Live News) येथे छापे टाकण्यात आले होते.
अवैध सावकार करतात ‘मुळशी पॅटर्न’चा वापर
अवैध सावकारीचा धंदा सोपा धंदा झाला आहे. अगोदर अवघे १ ते २ टक्के मासिक व्याज घेतले जात होते पण अलीकडच्या काळात चक्क २५ टक्क्यापर्यंत व्याज आकारले जाते. अगोदरच अवैध असलेल्या या सावकारी धंद्यात सावकार स्वतःचा पैसा सुरक्षित करण्यासाठी ‘हिटलरशाही’चा वापर करतात. सावकार एखाद्याला व्याजाने पैसे देताना अगोदर त्याच्याकडून स्टँम्प लिहून घेतात किंवा नोटरी करतात. त्यात देखील हुशारी करीत कागदोपत्री दोनच टक्के व्याज दाखविले जाते. नोटरी आणि स्टॅम्प तर ठीक आहे परंतु अनेक अवैध सावकार समोरील व्यक्तीचे वाहन, एखादी मालमत्ता किंवा घराचे खरे दस्तऐवज स्वतःकडे ठेवून घेतात. व्याजाने दिलेले पैसे परत करण्यासाठी आणि नियमीत व्याज देण्यासाठी एक मुदत निश्चित केलेली असते. ठरलेल्या दिवशी व्याज न मिळाल्यास चक्रवाढ व्याज पेक्षाही अधिक दराने वसुली सुरु होते. काही ठराविक सावकार एखादी मोठी रक्कम २ टक्के व्याजाने अधिक कालावधीसाठी देत असतात. आपले पैसे वेळेत परत येत नसल्याचे लक्षात येतात सावकार कर्जदारांच्या घरी जाऊन गोंधळ घालणे, धमक्या देणे, मारहाण करणे असे प्रकार देखील करीत असतात.
हे देखील वाचा : सावकारांचे धाबे दणाणले; मुक्ताईनगर, बोदवडमध्ये सावकारांची झाडाझडती
अवैध सावकारी व्यवसाय कसा फोफावला?
जळगावात नव्हे तर संपूर्ण राज्यात गेल्या काही वर्षात अवैध सावकारी व्यवसाय फोफावला आहे. अवैध सावकारी व्यवसाय करणारे बहुतांश व्यक्ती हे गुंडगिरी करणारे, स्वतःचा अगोदरच एखादा व्यवसाय असलेले आहेत. अवैध सावकारी व्यवसाय करायला कोणताही परवाना आवश्यक नाही. १० हजारांचे भांडवल जरी असले तरी अवैध सावकारी सुरु होते. १० हजाराला मासिक १० टक्के जरी व्याज घेतले तर महिन्याला १ हजार रुपये सहज मिळातात. लाखभर रुपये हाताशी असले तर स्वतःचा महिन्याचा खर्च सहज निघतो. समाजात गरजू आणि व्याजाने पैसे हवे असलेले लोक गल्लोगल्ली भेटतात. व्याजाचा धंदा म्हणजे इमानदारीचा धंदा. व्याजाने घेतलेले पैसे परत करण्यासाठी बहुतांश नागरिक ठरलेल्या दिवशी येतात आणि नाही जरी आले तरी सावकाराचाच फायदा असतो. अवैध सावकाराला घाबरून लोक अगोदरच पैसे देत असतात.
सावकारांनी लावला तगादा, आत्महत्या वाढल्या
जळगावात आणि राज्यात देखील अवैध सावकारी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. सावकारी पैशांचे व्याज अव्वाच्या सव्वा असल्याने बऱ्याच वेळा कर्जदार ते देऊ शकत नाही. परिणामी सावकारांच्या धमक्या, मारझोड, दररोज घरी येणे, चारचौघांमध्ये होणारा अपमान यामुळे कर्जदार खचतो. झटपट पैसे परत देण्याच्या नादात तो काहीतरी चूक करून बसतो किंवा सट्टा-पत्त्याच्या मागे लागून आणखीनच कर्जबाजारी होतो. सावकाराचा तगादा वाढल्याने शेवटी आत्महत्या हाच पर्याय कर्जदारासमोर शिल्लक राहतो. बहुतांश वेळी तरुण आणि शेतकरी सावकारांच्या छळाला बळी पडतात आणि आपला जीव गमावतात.
महाराष्ट्र सरकारचा कायदा काय सांगतो?
बेकायदेशीर सावकारीच्या समूळ उच्चाटनासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश 2014 हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे. नव्याने लागू केलेल्या महाराष्ट्र सावकारी कायद्यानुसार राज्यातील बेकायदेशीर वा अवैध सावकारीला निर्बंध घालण्यात आले असून परवानाधारक सावकारांसाठीही नवी नियमावली या अध्यादेशनुसार शासनाने निश्चित केली आहे. या सावकारी कायद्यातील प्रमुख बाबीमध्ये परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांना पिकासाठी व शेतीसाठी कर्ज देताना त्यांची स्थावर मालमत्ता आता तारण घेता येणार नसून कर्जाच्या मुद्दलापेक्षा जास्त व्याज घेता येणार नाही. तारण व विनातारण कर्जासाठी शासनाने निश्चित केलेले व्याजदर आकारणे बंधनकारक आहे. तसेच दर तीन महिन्याला शेतकऱ्याला पावती देणेही बंधनकारक केले असून दरवर्षी सावकारी परवान्याचे नुतनीकरण करणे बंधनकारक केले आहे. सुधारित अध्यादेशातील महत्वाच्या तरतूदींची माहिती शेतकऱ्यांना करुन देण्यासाठी संक्षिप्त माहिती पुस्तिका सहकार विभागामार्फत तयार करण्यात आली असून यामध्ये परवाना मिळविण्याची पद्धती, परवाना नाकारणे, आर्थिक वर्ष, परवाना रद्द करणे, निबंधकाचे तपासणीचे व न्यायालयीन अधिकार, सावकाराने बेकायदेशीररित्या बळकावलेली स्थावर मालमत्ता परत करणे, सावकारी व्यवसाय करीत असतांना कोरी कागदपत्रे न करणे, आवश्यक हिशेब पुस्तके, नोंदवह्या ठेवणे, व्याजदरावर बंधन, कर्जाचे अधिकार, दंड व शिक्षेची तरतूद, कर्जदारांस मिळणाऱ्या संरक्षणाचा समावेश आहे.
हे देखील वाचा : सावकाराची दादागिरी : न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदाराला घर वस्तू मिळाल्या परत
कायद्यानुसार होऊ शकते ५ वर्षापर्यंत कैद, ५० हजार दंड
नव्या सावकारी कायद्यानुसार विनापरवाना व अवैध सावकारी केल्यास संबंधितांस 5 वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा 50 हजार रुपयांपर्यंत दंड यापैकी एक किंवा दोनही प्रकारच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच परवाना प्राप्त करुन घेताना हेतूपुरस्पर व जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती अर्जासोबत सादर केल्यास 2 वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा 25 हजार पर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. खोट्या नावाने परवाना घेणे, नमूद पत्त्याव्यतिरीक्त किंवा कार्यक्षेत्राबाहेर सावकारी व्यवसाय करणे, दुसऱ्याच्या नावावर सावकारी करणे या बाबी आढळल्यास पहिल्यांदा गुन्हा केल्यास 1 वर्षापर्यंत कैद किंवा 15 हजार रुपये दंडाची शिक्षा, हाच गुन्हा दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर केल्यास 5 वर्षापर्यंत कैद किंवा 50 हजारापर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. कोरी वचन चिठ्ठी, बंधपत्र वा इतर प्रकारची कागदपत्रे घेतल्यास 3 वर्षापर्यंतच्या कैदेची शिक्षा किंवा 25 हजार पर्यंत दंडाची शिक्षा आहे. परवानाधारक सावकाराने सर्व आवश्यक अभिलेख न ठेवल्यास वा या तरतुदींचे पालन न केल्यास 25 हजार पर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तर तरतुदीपेक्षा जास्त व्याज आकारणी केल्यास प्रथम अपराधास 25 हजारापर्यंत तर नंतरच्या अपराधास 50 हजारापर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. कर्जाच्या तरतुदीसाठी सावकाराने कर्जदाराचा विनयभंग, छळवणूक केल्यास 2 वर्षापर्यंत कैद किंवा 5 हजार पर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.
कुठे करता येईल तक्रार
महाराष्ट्र शासनाच्या कायद्यान्वये कर्जदाराला देखील संरक्षण देण्यात आले आहे. कर्जदाराने सावकारांकडून घेतलेली रक्कम 15 हजारपेक्षा जास्त नसल्यास व कर्जदार हा स्वत: शेती करणारा असल्यास डिक्रीद्वारे ही रक्कम वसुली संदर्भात कर्जदारास अटक करता येणार नाही, अशी कायद्यात तरतूद आहे. शासनाकडून या कायद्याची अंमलबजाणी केली जात असली तरी शेतकऱ्यांनीही शक्यतो सहकारी संस्थाकडूनच कर्ज घेण्यास प्राधान्य द्यावे. अपरिहार्य कारणास्तव सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ आलीच तर सावकार परवानाधारक आहे, याची खात्री करावी. सावकाराकडून फसवणूक अथवा उपद्रव होत असल्यास सहकार विभाग व जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधता येतो. तसेच शासनाने सुरु केलेल्या हेल्पलाईन क्रमांक 022-61316400 यावर तक्रार केल्यास देखील मदत मिळू शकते. सावकार घरापर्यंत येऊन पोहचला आणि त्रास देत असेल तर कर्जदार 112 कॉल करून मदत मागू शकतात.