जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२२ । अगोदर एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत होते परंतु निवडणूक झाल्यावर सर्व विसरून जात होते. अलीकडच्या कालखंडात सर्व बदलले होते. महागाईवरून लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळे विषय हे बाहेर काढत आहेत. भोंगे बिंगे विसरून जा आणि महागाईविरोधात एकजूट करा. पूर्वी ७ पैसे डिझेलचे दर वाढले होते तेव्हा अटलजींनी बैलगाडीवर मोर्चा काढला होता. स्मृती इराणी यांनी रान पेटवले होते. आता कोणत्या बिळात पळाले हे समजत नाही. आम्ही महिन्याभरात दर कमी करू असे आश्वासन द्यायला कुणीही पुढे येत नाही. महागाई कमी करू इतकाच शब्द ऐकायला आम्ही इच्छुक आहोत, असे राष्ट्रवादी काँगेसचे नेते एकनाथराव खडसे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसने जळगावात खा.सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते. खडसे पुढे म्हणाले, पेट्रोल, डिझेलचे दर १५० च्या पुढे जाणार आहेत. देश दिवाळखोरीकडे वाटचाल करतो आहे. ऐन शेतकऱ्याच्या शेतात गहू आला, कांदा आला आणि निर्यात बंद झाली असे आजच्या इतिहासात कधीच झाले नाही. राज्यात आपली सत्ता आहे म्हणून केंद्राच्या विरोधात आंदोलन करू नये असे कुठेच नाही. कोण केतकी चितळे? मी आता या पोरींचे नाव ऐकतो आहे. एकाद्या मोठ्या नेत्याविरुद्ध बोलायचे आणि आपले नाव करून घ्यायचे अशी परिस्थिती आहे, असे ते म्हणाले.
एकनाथराव खडसेंनी सांगितले कि, महागाईविरोधात एकजूट व्हायला हवे. हजारो महिला जेव्हा महागाईविरोधात रस्त्यावर येतात तेव्हा सरकारला जाग येते. गावोगाव महिलांचे मोर्चे निघतील तेव्हा सरकार तुमच्या भावनांची दखल घेईल. आजची भूमिका जी आहे ती योग्य नाही. सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळेल असे निर्णय घ्या. महागाई कमी करण्याची अपेक्षा करणे काही गैर नाही. सरकारला जागे करण्यासाठी मोठ्या मोर्च्याचे नियोजन करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी केले.
पहा व्हिडीओ प्रक्षेपण :