जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२४ । मुक्ताईगनर शहरातील गोदावरी नगर परिसरातील बंद घरात घुसून चोरी करण्याच्या इराद्याने आलेल्या दोघा अट्टल चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले. अनेक गुन्ह्यात या चोरट्याचा सहभाग असल्याची माहिती मिळत असल्याने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रामा अण्णा पवार (वय २७, रा. भोकरदन, जि. जालना) असे या चोरट्याचे नाव आहे.
तो गेल्या काही वर्षांपासून अनेक गुन्ह्यात फरार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे ११ डिसेंबरच्या रात्री दोन वाजेच्या सुमारास आरोपी राम अण्णा पवार व त्याचा एक साथीदार अशा दोघांनी गोदावरी नगर परिसरात राहणाऱ्या आरोग्य कर्मचारी जयश्री थेटे यांच्या घरात कडीकोंडा तोडून प्रवेश घेतला होता. या परिसरात इतर ठिकाणी देखील चोरी करण्याचा त्यांचा मानस होता. अशातच बोदवड पोलिस स्टेशनला नेमणुकीला असलेले अतुल बोदडे यांना या घरात चोर लपून बसल्याची माहिती मिळाली.
त्यांनी तत्काळ स्थानिक मुक्ताईनगर पोलिसातील सचिन जाधव, सुरेश मेढे गोविंदा सुरवाडे यांना फोन करून बोलावून घेतले व सापळा रचत रामा अण्णा पवार यास ताब्यात घेतले. यादरम्यान एक संचयित आरोपी मात्र फरार झाला. दरम्यान, बंद घराच्या मालकीण जयश्री थिटे या पुणे येथे गेलेल्या असल्याने अद्याप पावतो गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सरु आहे.
पोलिस बोदडे यांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक
अतुल बोदडे हे बोदवड पोलिस स्टेशनला नेमणुकीला आहेत. मंगळवारी त्यांची सुटी असल्याने ते घरी होते. रात्रीच्या सुमारास थेटे यांच्या घरात कोणीतरी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी इतर स्थानिक कर्मचाऱ्यांना फोन केला असता पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांनी तत्काळ कर्मचाऱ्यांना घटनास्थळाकडे रवाना केले. याप्रसंगी आरोपींनी दगड आणि लोखंडी पाइपने देखील मारण्याचा प्रयत्न बोदडी यांना केला, मात्र भीती न बाळगता बोदडे यांनी पवार यास स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.