जळगाव लाईव्ह न्यूज । भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्वतःच्या आरोग्याची, परिवाराची तमा न बाळगता दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणाऱ्या, आंधळ्यांची काठी, कर्मठशाहीच्या प्रचंड विरोधक, करुणेचा सागर, ममतेचा पाझर, प्रेमळ, कष्टाळू, परोकारी, न्यायप्रिय, आरोग्याची दायी आणि तुम्हा आम्हा सर्वांची माई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावित्री शक्तीपीठ जामनेर (कार्यक्षेत्रः महाराष्ट्र) व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पूजन करून सर्वांनी अभिवादन केले.
वारसा स्री शक्तीचा, वसा साऊ-जिजाऊचा, ध्यास समता सन्मानाचा अंतर्गत सावित्रीच्या लेकींचा सन्मान सोहळा जामनेर गुरुकुल कोचिंग क्लासेस हॉल येथे संपन्न झाला. यात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सावित्रीच्या लाडक्या लेकींचा म्हणजेच से.नि. मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा नसिकेत नरवाडे, से.नि.शिक्षिका सौ. ज्योत्स्ना सुनिल विसपुते, तज्ज्ञ डॉ. मोहिनी सुभाष मोरे यांच्या वतीने सौ. संगिता मोरे, उपशिक्षिका सौ. उषा नारायण सुरळकर, उद्योजिका सौ. पूनम संजय चौधरी यांचा पिवळा फेटा घालून शाल, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देवून यथोचित सन्मान करण्यात आला. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल क्रांतीसूर्य म. ज्योतिबा फुले चॅरीट्रेबल ट्रस्टचे सचिव जितेंद्र गोरे यांनी उद्बोधक माहिती दिली.
सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी उत्तरात सत्कारार्थी मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या की, सौ. ज्योत्स्ना विसपुतेः सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन येणाऱ्या काळात अधिकाधिक समाज सेवा करतांना सर्वांना सोबत घेऊन ‘स्त्री हिच शक्ती’ असून विज्ञान त्याच बरोबर श्रध्दा एकत्र आल्यास सावित्री शक्तीपीठ जामनेर महाराष्ट्रात उल्लेखनिय कार्य करेल. सौ. प्रतिभा नरवाडे : स्पृश्य अस्पृश्य भेद ज्यावेळी पाळल्या जायचा त्यावेळी सावित्रीबाईं व म. फुले यांनी महिला व अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली हे छोटे काम नव्हते. सौ. उषा सुरळकर : सावित्रीमाईंना ज्योतिराव फुले यांची खंबीरसाथ दिल्याने सावित्रीबाई इतके महान कार्य करू शकल्या. यांची समायोजित भाषणे झाली.
तसेच यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष जे. डी. पाटील सर यांचे अध्यक्षीय भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महा. अनिस ज. जि. उपाध्यक्ष नाना लामखेडे सर व सूत्रसंचालन महा. अनिस कार्याध्यक्ष बी. आर. पाटील सर यांनी तर जळगाव जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बोऱ्हाडे आभार मानले.
व्यासपीठावर महाराष्ट्र अंनिस जामनेरचे अध्यक्ष जे.डी. पाटील सर, प्रधान सचिव भीमराव दाभाडे, सावित्री शक्तीपीठ जामनेरच्या अध्यक्ष सौ. ज्योत्स्ना विसपुते आदी. मान्यवर होते. तसेच कार्यक्रमास सावित्री शक्तीपीठाच्या महासचिव सौ. रूपालीताई गोरे, उपाध्यक्षा श्रीमती वैशालीताई चौधरी तर महा. अनिसचे जामनेर शाखा उपाध्यक्ष रमेश गायकवाड, डी. एस. पाटील, समता परिषदेचे पवन माळी, सत्यशोधक समाजाचे रमेश वराडे, टाकळी येथील सुभाष माळी, छावा संघटनेचे विलास पाटील, सौ. सुशिला चौधरी, सौ. शोभा बोऱ्हाडे, सौ. कमलबाई रमेश गायकवाड, यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावित्री शक्तीपीठ व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समितीच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.