जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२५ । जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात प्रेम विवाह केल्याच्या रागातून ऑनर किलिंगची घटना समोर आलीय. प्रेमविवाह केलेल्या स्वतःच्या मुलीवरच सीआरपीएफच्या निवृत्त PSI बापाने गोळी झाडून तिचा खून केला. तर या गोळीबारात जावईही गंभीर जखमी झाला. तर, घटनेनंतर जमावाने केलेल्या मारहाणीत सासराही जखमी झाला. तृप्ती अविनाश वाघ (वय २४) असं मृत मुलीचे नाव असून अविनाश ईश्वर वाघ (२८, दोघे रा. करवंद, शिरपूर, ह. मु., कोथरूड, पुणे)असं जखमी झालेल्या जावयाचे नाव आहे.

नेमकी घटना काय?
एक वर्षापूर्वी घरच्यांच्या मर्जीच्या विरोधात मुलीने अविनाश वाघ या तरुणांसोबत प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर हे दाम्पत्य पुण्यात राहत होतं. पण आरोपी सासरा किरण अर्जुन मंगले (४८, रा.शिरपूर) याला हा विवाह पसंत नव्हता. प्रेमविवाहाचा राग मुलीच्या पित्याच्या डोक्यात होता. अविनाशच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी तृप्ती व जावई अविनाश हे दोघे चोपडा येथे दाखल झाले होते. मात्र मुलीच्या वडिलांना ही माहिती कळताच त्यांनी चोपडा शहर गाठत हळदीच्या कार्यक्रमात आले.
हळदीचा कार्यक्रम आटोपल्या नंतर किरण आणि तृप्ती हे समोरासमोर आले. तृप्ती हिला पाहताच किरण याने त्याच्याकड़ील रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली. यात मुलगी तृप्ती ठार झाली. तिला वाचवण्यासाठी अविनाश गेला असता तोही गोळी लागून जबर जखमी झाला. अविनाश याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगावला हलविण्यात आले आहे.
या घटनेनंतर नातेवाइकांनी केलेल्या मारहाणीत मुलीचे वडील माजी सैनिक अर्जुन मांगले हे देखील गंभीर जखमी झाले आहेत या घटनेमुळे एकच खडबड उडाली आहे दरम्यान, शनिवारी रात्री १२:१५ वाजेच्या सुमारास जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी चोपड्यात जाऊन घटनेची माहिती घेतली.