⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा हजारोंचा ऐवज असलेली पर्स केली परत!

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा हजारोंचा ऐवज असलेली पर्स केली परत!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२२ । आजकालच्या जगात फसवणूक, लबाडीचे प्रमाण वाढत असतानाच एका रिक्षा चालकाने प्रामाणिकपणा दाखवत आदर्श उभा केला आहे. सोमवारी सायंकाळी रिक्षात राहिलेली पर्स चालकाने प्रामाणिकपणे महिलेला परत दिली आहे. शनिपेठ पोलिसांनी चालकाचा सत्कार केला.

नाशिक येथील क्रांती नगरात राहणाऱ्या विमलबाई चंद्रकांत खैरनार या भाचीच्या लग्नासाठी भुसावळ येथे आल्या होत्या. भुसावळ येथून लग्न आटोपून विमलबाई दि.२८ रोजी सायंकाळी ट्रॅव्हल्सने अजिंठा चौफुली येथे उतरल्या. अजिंठा चौफुलीहून रिक्षा क्रमांक एमएच.१९.एई.७९९४ ने त्या बालाजी मंदिरजवळ भावाच्या घरी उतरल्या. घरी पोहचताच पर्स रिक्षात राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले.

पर्समध्ये २ मोबाईल, १० हजार रोख, सोन्याचे दागिने असा ऐवज असल्याने विमलबाई घाबरल्या. स्वतःच्या मोबाईलवर त्यांनी संपर्क केला असता कुणीही मोबाईल स्वीकारला नाही, त्यामुळे त्यांनी शनिपेठ पोलीस ठाणे गाठत पोलिसांना कळविले. पोलिसांनी देखील शोध घेतला परंतु चालक मिळून आला नाही.

मंगळवारी सकाळी रिक्षा साफसफाई करताना रिक्षा चालक अब्दुल रशीद अब्दुल कादर रा.सुप्रीम कॉलनी यांना पर्स आढळून आली. पर्समधून मोबाईल काढत त्यांनी अगोडर आलेल्या क्रमांकावर संपर्क साधत पर्स मिळाली असल्याचे कळविले. चालकाने शनिपेठ पोलीस ठाणे गाठून प्रामाणिकपणे पर्स महिलेला परत दिली. प्रसंगी शनिपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी अमोल विसपुते, मनोज इंद्रेकर, सुनील पवार, गिरीश पाटील, रविंद्र बोदवडे, मुकुंद गंगावणे यांनी पुष्पगुच्छ देऊन रिक्षा चालक अब्दुल रशीद अब्दुल कादर यांचा सत्कार केला. विमलबाई यांच्यासह परिवाराने देखील रिक्षा चालकाचे आभार मानले.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.