जळगाव लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२५ । गेल्या काही दिवसापासून भारतीय रुपयाची घसरण सुरु असून आज बुधवारी भारतीय रुपयामध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयानं महत्त्वाचा ९० रुपयांचा टप्पा ओलांडला आणि आतापर्यंतचा नीचांक गाठला. याचा आपल्या खिशालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

रुपयाच्या घसरणीचे कारण काय?
बँकांनी उच्च पातळीवर अमेरिकन डॉलर्सची सतत खरेदी सुरू ठेवल्याने आणि परकीय भांडवल बाहेर जाण्यामुळे रुपयावर दबाव वाढला आहे. व्यापार आणि पोर्टफोलिओ प्रवाह कमकुवत झाल्यामुळे तसेच भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल वाढती अनिश्चितता यामुळे ही घसरण झाली आहे. या घटकांमुळे संपूर्ण सत्रात चलनावर सतत दबाव राहिला.

रुपयातील तीव्र घसरणीचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावरही झाला. कमकुवत होत चाललेल्या चलनामुळे महागाई आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या हालचालींबद्दल चिंता वाढल्याने मागच्या तीन चार सत्रापासून निफ्टी सेन्सेक्स देखील घसरला.

दरम्यान आज बुधवारी सकाळी करन्सी मार्केट उघडताच डॉलरच्या तुलनेत रुपया 89.96 वर उघडला आणि काही मिनिटांत 90.1325 वर घसरला, जो मागील सत्रात 89.87 वर बंद झाला होता. मंगळवारी चलनाने विक्रमी नीचांकी पातळी गाठल्यानंतर ही घसरण झाली.
आपल्यावर कसा परिणाम होईल?
डॉलर हे जगातील सर्वात मोठे चलन आहे, जे बहुतेक व्यवहारांसाठी वापरलं जातं. डॉलरच्या घसरणीचा तात्काळ परिणाम महागाईत वाढ होण्यानं होऊ शकतो. आपण परदेशातून आयात करत असलेल्या वस्तू अधिक महाग होतील, जसं की पेट्रोल, खतं, सोनं, इलेक्ट्रॉनिक्स आणि मशीनचे भाग. भारत मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आणि डाळी आयात करतो. डॉलरच्या वाढीमुळे तेल आणि डाळींच्या किमती वाढू शकतात, ज्यामुळे त्यांच्या किमतींवर परिणाम होईल. यामुळे तुमचं स्वयंपाकघर बजेट विस्कळीत होऊ शकतं. शिवाय, परदेशी शिक्षण, प्रवास, डाळी, खाद्यतेल, कच्चं तेल, कम्प्युटर, लॅपटॉप, सोनं, औषधं, रसायनं, खतं आणि आयात केलेली अवजड यंत्रसामग्री अधिक महाग होऊ शकते.



