कन्नड घाटात ५ डिसेंबरपर्यंत ‘या’ वेळेतच अवजड वाहतुकीला परवानगी
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । कन्नड घाटात संरक्षण भिंतीचे काम सुरु असल्याने व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या घाटातून दिवसा होणारी अवजड वाहतूक ५ डिसेंबरपर्यंत बंद करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नुकतेच काढले असून रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत मात्र हा घाट अवजड वाहतुकीसाठी खुला राहणार आहे.
दि.३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे कन्नड घाटात जागोजागी दरड कोसळल्याने महामार्ग खचला होता. त्यामुळे घाट वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला होता. त्यानंतर या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करून दि.१५ सप्टेंबर रोजी दुचाकी व हलक्या वाहनांसाठी व त्यानंतर दि.९ नोव्हेंबर रोजी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी हा घाट खुला करण्यात आला होता. मात्र घाटात काही ठिकाणी संरक्षण भिंत उभारणी व रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे घाटात कोंडी निर्माण होऊन पूर्ण दिवस-रात्र वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे या घाटातून होणारी अवजड वाहतूक दि.१७ ते २७ दरम्यान, बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.
दिवसा वाहतुकीसाठी घाट बंद
कन्नड (औट्रम) घाटात दोन ठिकाणी संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने या कामामुळे वाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी या घाटातून दिवसा होणारी अवजड वाहतूक पुर्वीप्रमाणे वळविणे योग्य राहील, असा पत्र व्यवहार भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आला होता. त्यानुसार हा घाट दि.५ डिसेंबरपर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. रात्री ८ ते सकाळी ८ वाजेदरम्यान, मात्र अवजड वाहतुकीसाठी हा घाट खुला राहणार आहे.
दिवसा ‘या’ मार्गाने वळविली वाहतूक
सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत औरंगाबादकडून धुळे येणारी व जाणारी अवजड वाहतूक औरंगाबाद-देवगाव-रंगारी-शिरुर बंगला-नांदगाव-मालेगावमार्ग धुळे व औरंगाबादकडून चाळीसगावकडे येणारी व जाणारी वाहतूक औरंगाबाद-देवगांव-रंगारी-शिरुर बंगला-नांदगावमार्गे चाळीसगाव अशी, वळविण्यात आली आहे.