जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२३ । जुलै महिन्या अर्धा संपला तरी राज्यातील काही भागात हवा तसा पाऊस न झाल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचा पेरण्या खोळंबल्या आहेत तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत असून यामुळे 17 व 18 जुलै या राज्यात पावसाचा जोर वाढवण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान खात्याने पुढील 4 दिवस राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार आणि अतिवृष्टीचा इशारा व्यक्त केला आहे.
कोणत्या भागात होणार पाऊस?
येत्या 4 दिवसांमध्ये म्हणजे आजपासून 19 जुलै दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागने दिला आहे. मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे. पुणे वेधशाळेचे महासंचाक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. दरम्यान जुलैअखेर मान्सून राज्यातील सरासरी भरून काढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्गातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान खात्याकडून राज्यासाठी 5 दिवसांचा येलो अलर्ट जारी केला असून 17 जुलैला रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यात अद्यापही मुसळधार नाही
जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहे. सकाळपासूनच आभाळ झाकोळून येत असलं तरी पाऊस मात्र हुलकावणी देत आहे. ढगाळ आणि पावसाच्या वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिक आनंदले. मात्र जिल्ह्याला अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.