जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२३ । देशातील अनेक राज्यांतून मान्सूनचा पाऊस परतीच्या मार्गावर असला तरी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तो महाराष्ट्रात सक्रिय राहण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत राज्यात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून बळीराजा सुखावला आहे.
या भागाला पावसाचा इशारा
हवामान खात्याच्या पुणे वेधशाळेने कोकणात अतिवृष्टी, तर कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’, तर पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देखील जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
जळगाव जिल्ह्यातील पावसाची स्थिती?
महाराष्ट्रातून मान्सून ४ ऑक्टोबरपासून परतण्यास सुरुवात होईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागानं दिलेली आहे. यादरम्यान, राज्यातील अनेक भागात पाऊस लावेल. जळगाव जिल्ह्यात मात्र पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आगामी आठवडाभर तरी जिल्ह्यात पावसाची शक्यता कमीच आहे.
दरम्यान, सध्या पावसाच्या पावसाने विश्रांती घेतल्याने जळगाव शहरातील तापमानाचा पारा ३३ ते ३४ अंशावर जात असून ८ ऑक्टोबर पर्यंत तापमानाचा पारा ३८ अंशावर जाणार आहे. त्यामुळे जळगावकरांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.