जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२४ । जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला होता. तसेच, काही तालुक्यांमध्ये उघडीप मिळाल्यामुळे सूर्य दर्शनही झाले होते. मात्र, आता पुन्हा जिल्ह्यात पाऊस सक्रिय होणार आहे. काल शुक्रवारी सायंकाळी जळगाव शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. अशातच हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान विभागाकडून शनिवार व रविवारी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जोरदार ते अतीजोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामानविभागाकडून वर्तविण्यात आला आहे. जोरदार पावसासोबतच किमी वेगाने ४० ते ५० वारेदेखील वाहणार आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत जर बाहेर फिरायला जात असाल, तर योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.
३ ते ४ ऑगस्ट रोजी जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यानंतर ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान हा जोर कमी होईल. मात्र, ८ ऑगस्टपासून पुन्हा पाऊस वाढणार आहे.
महाराष्ट्रात आज कुठे कुठे कोसणार पाऊस?
आयएमडीच्या अंदाजानुसार, आज शनिवारी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. दुसरीकडे मुंबईसह पालघर, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदियासह आसपासच्या भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, नगर, छत्रपती संभाजी, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे.